महाराष्ट्र एकीकरण समिती महिला आघाडीतर्फे आयोजित महिला मेळावा आणि हळदीकुंकू समारंभ काल सोमवारी सायंकाळी महिलांच्या उस्फुर्त प्रतिसादात पार पडला.
शहरातील मराठा बँकेच्या सभागृहामध्ये महिला आघाडीचे अध्यक्ष माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या अध्यक्षतेखाली या महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून नगरसेविका वैशाली सिद्धार्थ भातकांडे आणि माजी उपमहापौर रेणू मुतकेकर यांच्यासह महिला आघाडीच्या सरचिटणीस माजी महापौर सरिता पाटील, आणि उपाध्यक्षा माजी नगरसेविका सुधा भातकांडे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी अर्चना देसाई व ग्रुपने ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करण्याद्वारे महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभाचे उद्घाटन करण्यात आले. महिला आघाडीचे अध्यक्षा रेणू किल्लेकर यांनी सर्वांचे स्वागत व प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी महिला आघाडीच्या कार्याची थोडक्यात माहिती दिली. उद्घाटनपर भाषणात नगरसेविका वैशाली भातकांडे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करण्याबरोबरच संक्रांत सणाचे महत्त्व विशद केले.
सदर समारंभाला प्रारंभ होण्यापूर्वी महिला आघाडीतर्फे सभागृहात विविध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्या स्पर्धांमधील यशस्वी स्पर्धकांना पाहुण्यांचे असते पारितोषिके देण्यात आली. यावेळी ग्रुप गेममध्ये प्रथम आलेल्या शिवानी रजपूत ग्रुप आणि पैठणी गेममध्ये प्रथम आलेल्या भारतीय जुवेकर यांना पाहुण्यांच्या हस्ते आकर्षक बक्षीसं देऊन गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रिया कुडची यांनी केले. याप्रसंगी शहरातील विविध महिला मंडळांचा महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेवटी माजी महापौर सरिता पाटील यांनी सर्वांचे विशेष करून मेळाव्यासाठी हॉल उपलब्ध करून दिल्याबद्दल मराठा बँकेचे आभार मानले. महिला मेळावा व हळदीकुंकू समारंभ यशस्वी करण्यासाठी रेणू किल्लेकर व सरिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महिला आघाडीच्या सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.