बससेवे अभावी हालगा (ता. जि. बेळगाव) गावातील नागरिक व विद्यार्थ्यांची गैरसोय होत असल्यामुळे याठिकाणी सकाळी आणि सायंकाळच्या सत्रात कायम स्वरूपी दोन बस फेऱ्या सुरू कराव्यात, अशी मागणी हालगा ग्रामपंचायतीने वायव्य कर्नाटक राज्य परिवहन मंडळाच्या बेळगाव विभाग व्यवस्थापकांकडे केली आहे.
हालगा ग्रा. पं. अध्यक्ष लक्ष्मी गजपती यांच्या नेतृत्वाखाली ग्रा. पं. सदस्यांनी उपरोक्त मागणीचे निवेदन आज शनिवारी सकाळी बेळगाव परिवहन मंडळाच्या व्यवस्थापकांना सादर केले. त्यांनी निवेदन स्वीकारून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. बस सेवा व्यवस्थित नसल्यामुळे हालगा गावातील शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसह कामानिमित्त शहराकडे जाऊ इच्छिणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अन्य गावांच्या बसेस देखील हालगा गावातून जाण्याएवजी परस्पर राष्ट्रीय मार्गाने पुढे जातात. असतात त्याचप्रमाणे ज्या कांही बसेस गावातून जातात त्या बऱ्याचदा नागरिकांनी विनंती करूनही थांबा घेत नाहीत. वेळेवर बस मिळत नसल्यामुळे गावातील विद्यार्थी व नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून आपण याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. तसेच हालगा गावासाठी सकाळी 8 आणि 9 वाजता त्याचप्रमाणे सायंकाळी 5 आणि 6 वाजता कायमस्वरूपी बस सेवा सुरू करावी ही विनंती अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे. निवेदन सादर करतेवेळी ग्रामपंचायत अध्यक्ष लक्ष्मी गजपती यांच्यासह ग्रा. पं. सदस्या लक्ष्मी संताजी, रूपा सुतार, माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य सदानंद बिळगोजी, गणपत मारीहाळकर आदी उपस्थित होते.