बेंगलोर येथे सार्वजनिक शिक्षण खात्यातर्फे आयोजित पीयू बोर्डच्या 19 वर्षाखालील मुला -मुलींच्या जलतरण स्पर्धेत आबा व हिंद क्लबच्या जलतरणपटुनी उत्कृष्ट कामगिरी करताना 4 सुवर्ण, 1 रौप्य व 7 कांस्य अशी एकूण 12 पदके हस्तगत केली आहेत.
सदर स्पर्धा बेंगलोर येथील बसवनगुडी जलतरण तलावात नुकतीच पार पडली. या स्पर्धेत मयुरेश जाधव (जीएसएस कॉलेज) याने 1 मी. व 3 मी. स्प्रिंग बोर्ड डायव्हिंग व हायबोर्डमध्ये एकूण 3 सुवर्णपदके पटकाविली. स्वयम कारेकर (जीएसएस कॉलेज) याने 100 मी., 50 मी. ब्रेस्टस्ट्रोक व 4×100 मी. मिडले रिलेमध्ये अशी 3 कांस्य पदके संपादन केली. कु. धन्वी बर्डे (जैन कॉलेज) हिने 400 मी. वैयक्तिक मिडलेमध्ये सुवर्ण, 4×100 मी. मिडले रिले व 200 मी. ब्रेस्टस्ट्रोक मध्ये अशी 2 कांस्य पदके पटकाविली. तसेच कु. सामिया मणसे (केएलई इंडिपेंडेंट कॉलेज) हिने 800 मी. फ्रीस्टाइलमध्ये रौप्य, 400 मी. फ्रीस्टाइल व 4×100 मी. मिडले रिलेमध्ये अशी 2 कांस्य पदके मिळवली.
राज्यस्तरीय स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे मयुरेश जाधव, धन्वी बर्डे व सामिया मेणसे यांची पुढील महिन्यात होणाऱ्या राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी कर्नाटक राज्य संघात अभिनंदन निवड झाली आहे. या सर्व जलतरणपटू हे आबा व हिंद क्लबचे सदस्य असून यांना एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार, अमित जाधव व शिवराज मोहिते यांचे मार्गदर्शन त्याचप्रमाणे आई-वडिलांसह क्लबचे चेअरमन ॲड. मोहन सप्रे, अध्यक्ष शितल हुलबत्ते व अरविंद संगोळ्ळी यांचे प्रोत्साहन लाभत आहे.