अलारवाड येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाची पूर्ण तयारी झालेली असताना तसेच या ठिकाणी 195 एकर जमिनीचे संपादन झालेले असताना पुन्हा हलगा येथे सांडपाणी प्रकल्प उभारण्याचा घाट बेळगाव महानगरपालिका आणि पाणी पुरवठा विभाग घालत आहे. यासंदर्भात बेळगावचे शेतकरी कर्नाटक उच्च न्यायालयात गेले तसेच बेळगाव शेतकरी संघटनेचे अध्यक्ष नारायण सावंत, पत्रकार प्रसाद प्रभू आदी पाच जणांनी कर्नाटक उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या संदर्भातील चौकशी साठी आज कर्नाटक लोकायुक्त विशेष अधिकारी बेळगावला आले होते .
यावेळी महानगरपालिका आणि पाणीपुरवठा विभागाचे अधिकाऱ्यांकडून संबंधित अधिकारी वर्गाला चुकीची माहिती देऊन त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न झाला. दरम्यान याचिकाकर्त्यानी योग्य ती माहिती दिली आहे .
संपूर्ण बेळगाव शहराचे सांडपाणी बल्लारी नाल्याला सोडण्यात आले याचा आलारवाडच्या प्रकल्पाला काही संबंध नाही. अशा प्रकारच्या युक्तिवाद बेळगावच्या महानगरपालिका आणि पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला. दरम्यान बल्लारी नाल्याच्या पलीकडे पाईपलाईन कशासाठी घातली ,येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी घेतलेली जमीन हौसिंग बोर्डाकडे कशी गेली? यासारखे प्रश्न उपस्थित करून याचिकाकर्त्यांनी संबंधितांना भंडावून सोडले. नारायण सावंत यांनी कागदोपत्री माहितीच्या आधारावर शेतकऱ्यांची बाजू कशी बरोबर आहे हा मुद्दा सांगितला .पत्रकार प्रसाद प्रभू यांनी महत्त्वाच्या विषयांवर बोट ठेवले. यामुळे संबंधित लोकायुक्त अधिकार्यांना याचिकाकर्त्यांची बाजू ऐकून घ्यावी लागली. आता या संदर्भातील अहवाल कर्नाटक उच्च न्यायालयाला दिला जाणार असून त्यानंतर हलगा येथील सांडपाणी प्रकल्पाचे भवितव्य ठरणार आहे.