सांबरा : मराठी माणूस टिकला पाहिजे, मराठी भाषा टिकली पाहिजे हे आपण नेहमी प्रमाणे बोलत आहोत. तिची स्तुतीसुमने गात आहोत.पण मराठी भाषा, संस्कृती टिकविण्यासाठी नितांत गरज आहे ती मराठी शाळा टिकविण्याची! अनेक कारणे दाखवून सीमाभागातील मराठी शाळा बंद केल्या जात आहेत. बेळगाव शहर आणि परिसरातील मराठी माध्यमाच्या शाळांना पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी मराठी भाषिकांनी प्रयत्न कराचे आहेत. काही वर्षात मराठी शाळांच्या इमारतींवर प्रशासनाचा डोळा असून विविधची कारणे देत कानडी शाळांचे मराठी शाळेत स्थलांतर केले जात आहे. शाळांच्या विकासासाठी कमी प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जात असून पालकांचा इंग्रजीकडे कल वाढल्याचा परिणाम मराठी शाळांवर होऊ लागला आहे. त्यामुळे भाषा आणि संस्कृतीचा आत्मा असणाऱ्या प्राथमिक मराठी शाळांच्या टिकविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. हि परिस्थिती सध्या सीमाभागात अनुभवायला मिळत असूनही सांबरा येथील आदर्श सरकारी पूर्ण प्राथमिक शाळेची घोडदौड उल्लेखनीय अशी आहे.
स्पर्धात्मक युगात आपल्या पाल्याचा टिकाव लागण्यासाठी आज अनेक पालक मातृभाषा सोडून इंग्रजी माध्यमात आपल्या मुलांना शिक्षण देत आहेत. मातृभाषेतून शिक्षण दिलं कि पुढील प्रवास अवघड होतो असा काहींचा समज आहे. मात्र मातृभाषेतून शिक्षण घेत, सरकारी शाळेत शिक्षण पूर्ण करून आजवर अनेकांनी यशाचे सर्वोच्च शिखर गाठले आहे. हल्ली मराठी शाळा आणि त्यातूनही सरकारी शाळेतील पटसंख्या कमी होत चालली असून अशा शाळा टिकविण्यासाठी समाजातील अनेक भाषा, संस्कृतीप्रेमी आणि जबाबदार नागरिक पुढाकाराने कार्य करत आहेत, त्यापैकीच एक म्हणजे बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागातील सांबरा या गावचे मोहन हरजी!
सांबरा येथे सरकारी शाळा टिकविण्यासाठी मोहन हरजी सातत्याने प्रयत्न करत आहेत. सांबरा येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेत पटसंख्या वाढविण्यासाठी मोहन हरजी आणि शाळा सुधारणा समितीचे सर्व सदस्य अहोरात्र कार्य करत आहेत. हल्ली पालकांमध्ये निर्माण झालेली इंग्रजी माध्यमाची क्रेझ पाहता सरकारी शाळा ओस पडत आहेत. या पार्श्वभूमीवर कित्येक वर्षांपासून सरकारी मराठी शाळा टिकविण्यासाठी आणि वाढविण्यासाठी मोहन हरजी सर्वांना आपल्या समवेत घेऊन प्रयत्न करत आहेत.
इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठी शाळा सुधारणा कमिटीच्या सदस्यांसह घरोघरी जाऊन कागदपत्रे जमा करणे आणि पालकांना मराठी शाळेत पाल्यांना शिक्षण देण्यासाठी विनंती करणे, मातृभाषेतून मिळणाऱ्या शिक्षणाचे महत्व पटवून सांगणे आणि यासह अनेक उपक्रम राबवून पालक आणि विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचे कार्य एसडीएमसी कमिटीसह शाळेच्या शिक्षणाकडून केले जात आहे. प्रत्येक रविवारी शाळेची साफसफाई करणे, वृक्षारोपण करणे, शाळेच्या इतर गरजांकडे लक्ष देत त्या पुरविण्यासाठी प्रयत्न करणे असे अनेक उपक्रम एसडीएमसी कमिटी आणि सहकाऱ्यांच्या माध्यमातून होत आहेत. सोशल मीडियामुळे हल्ली अनेक शाळांमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा भरविण्यात येत आहे. या मेळाव्याच्या माध्यमातून माजी विद्यार्थ्यांना शाळेच्या अस्तित्वाचे महत्व पटवून देत शाळेच्या संवर्धनासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत.
सीमाभागात मराठीला नेहमीच डावलले जाते आणि याचप्रमाणे सांबरा येथील मराठी शाळेकडे देखील दुर्लक्ष केले जात असल्याची तक्रार एसडीएसमी सदस्य आणि ग्रामस्थांकडून होत आहे. मात्र अशा समस्या असूनही हि शाळा टिकविण्यासाठी अहोरात्र प्रयत्न होत असून लोकप्रतिनिधी, शिक्षण विभाग आणि प्रशासनाने अशा शाळांकडे कटाक्षाने लक्ष पुरवून शाळा सुधारण्यासाठी आणि पटसंख्या वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण द्यावे, शालेय इमारत, मुलांना पुरविण्यात येणारे शालोपयोगी साहित्य अशा सर्व गोष्टींमध्ये सकारात्मक पद्धतीने लक्ष पुरवावे आणि सरकारी शाळा टिकविण्यासाठी हातभार लावावा असे आवाहन ग्रामस्थांकडून केले जात आहे.