थीम: सर्वसमावेशक जल विकास आणि व्यवस्थापनासाठी भागीदारी आणि सहकार्य
नवी दिल्ली, 17 सप्टेंबर 2024: आठव्या भारत जल सप्ताह-2024 चे आयोजन 17 ते 20 सप्टेंबर दरम्यान भारत मंडपम, प्रगती मैदान, नवी दिल्ली येथे जलशक्ती मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले आहे. या विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते करण्यात येईल. या कार्यक्रमात महाराष्ट्रातील हिवरे बाजार (अहमदनगर), बजरवाडा (वर्धा) आणि खुरसापर (नागपूर) या ग्रामपंचायतींच्या जल व्यवस्थापनातील योगदानावर विशेष प्रकाश टाकला जाणार आहे.
महाराष्ट्रातील हिवरे बाजार, बजरवाडा आणि खुरसापर या ग्रामपंचायतींनी जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनासाठी केलेल्या सामुदायिक प्रयत्नांचे प्रदर्शन या कार्यक्रमात सादर केले जाईल.
हिवरे बाजार, बजरवाडा आणि खुरसापर या ग्रामपंचायतीने जलसंधारण आणि पाणी व्यवस्थापनासाठी केलेल्या कार्याविषयी*
हिवरे बाजार (अहमदनगर): हिवरे बाजार ग्रामपंचायतीने जल व्यवस्थापनाच्या नाविन्यपूर्ण उपाययोजनांचा अवलंब करून भूजल पुनर्भरण आणि जलसंधारणाच्या तंत्रांचा वापर केला आहे. या प्रयत्नांमुळे गावातील पाणीपुरवठा नियोजनबद्ध पद्धतीने केला जात आहे.
बजरवाडा (वर्धा): पावसाचे पाणी साठवण्यासाठी तलाव व छोटे बांध तयार करून बजरवाडा ग्रामपंचायतीने पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर केली आहे. यामुळे शेतीसाठी पाण्याची उपलब्धता वाढली असून शेती उत्पादनातही वाढ झाली आहे.
खुरसापार (नागपूर): खुरसापर ग्रामपंचायतीने जलसंधारणाच्या विविध उपाययोजना द्वारे भूजल पातळी सुधारली आहे, ज्यामुळे गावकऱ्यांना शेतीसाठी पुरेसे पाणी मिळाले आहे.
आठव्या भारत जल सप्ताहाचा उद्देश जागतिक स्तरावर जल व्यवस्थापनातील सर्वोत्तम पद्धतींचा आदान-प्रदान आणि सहकार्य वाढवणे आहे. या कार्यक्रमात विविध देशांमधील जलतज्ज्ञ आणि प्रतिनिधी सहभागी होत आहेत.