बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणत्याही परिस्थितीत गोहत्या होऊ नये, यासाठी आवश्यक ती काळजी घेण्यात यावी, अशी मागणी श्रीराम सेना हिंदुस्थानचे बेळगाव तालुका अध्यक्ष भरत पाटील यांनी केली आहे. त्यांनी काल सायंकाळी नूतन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांची सदिच्छा भेट घेऊन ही मागणी केली.
शहर परिसरात गांजाच्या विक्रीचे प्रमाण वाढत असून, त्यामुळे युवा पिढी व्यसनाधीन होत आहे. यामुळे समाजात अस्थिरता निर्माण होत असून, गैरप्रकार घडत आहेत. त्यामुळे गांजा विक्री रोखण्यासाठी कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी यावेळी करण्यात आली.
पोलीस आयुक्तांनी या बैठकीत गांजाच्या रॅकेटवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी जनतेच्या समस्या ऐकून त्यावर कार्यवाही करण्याचे वचन दिले.
या वेळी श्रीराम सेना हिंदुस्थानकडून नूतन पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. बैठकीस संघटनेचे ग्रामीण प्रमुख मोनाप्पा दयानंद पाटील (बेळगुंदी), किरण दत्तू पाटील (राकसकोप), आणि प्रवीण कुंडलाकर (उचगाव) उपस्थित होते.