बेळगाव:
गरीबी पाचवीलाच पुजलेली मात्र काही तरी आपण वेगळे करून दाखवायचा हा निश्चय मनात बाळगून पावर ट्रेलरच्या साह्याने शेतात चिखल करून पिके घेऊन गौंडवाडच्या कन्येने वकिली पदवी घेऊन साऱ्यांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. जिद्द, चिकाटी आणि मेहनत या जोरावर गरीबीवर मात करत त्या कन्येने शिक्षण घेतले. या तिच्या वाखण्याजोग्या कर्तृत्वामुळे तिचे गौंडवाडसह परिसरात कौतुक होत आहे.
नीता विनोद पवार रा. शिवाजी गल्ली गौंडवाड असे त्या विद्यार्थिनीचे नाव असून गौंडवाडात पहिली वकील महिला म्हणून तिने मान मिळवला आहे. तर तिचे सासर महिपाळगड ता. चंदगड या गावातही ती पहिली महिला वकील ठरली आहे . वडील हे शेती व्यवसाय तर आई भाजी विकून उदरनिर्वाह करत होती. आता रोजगारमध्ये त्यांना काम मिळाल्याने रोजगार हमी योजनेत त्या काम करायला जात आहेत. केवळ दहा बाय दहाच्या घरामध्ये या सर्वांचा संसार सुरू आहे. नीताला आणखी दोन बहिणी आणि एक भाऊ आहे. भावंडांमध्ये सर्वात मोठी तीच असल्याने साहजिकच तिच्यावरच घरची जबाबदारी पडली.
गौंडवाडामध्ये भात पिक लावणी करूनच घेतले जाते. त्यासाठी शेतामध्ये चिखल करावा लागतो. घरामध्ये मोठी असल्याने निताही स्वतः पॉवर ट्रेलर चालवून चिकल करत होती. त्यामध्ये नंतर भात लावणी केली जात होती. याचबरोबर शेतामध्ये रताळी, गाजर, बटाटे ही पिके देखील घेण्यासाठी वडील व तिची धडपड नेहमी सुरूच होती. शेती बरोबर पाच जनावरेही पाळली आहेत. त्या जनावरांना शेतातून चारा कापून आणणे, शेण काढणे, दूध काढणे ही जबाबदारी देखील नीतावरच होती. गावातील लहान घर जुने झाल्याने ते कोसळले. त्यामुळे शेतातच पत्राचा शेड उभा करून हे सर्वजण राहत आहेत .
घरच्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये शेती करत दहावीपर्यंत गावातील महात्मा गांधी हायस्कूलमध्ये शिक्षण घेतले. त्यानंतर ज्योती महाविद्यालयामध्ये कॉमर्स बारावी , त्यानंतर भाऊराव काकतकर कॉलेजमध्येमध्ये बी कॉम ची पदवी घेतली. ही पदवी घेतल्यानंतर वडील व आईने आपल्या मुलीला वकील करायचे ठरवले .मात्र परिस्थितीमुळे एक कठीणच होते. मात्र त्या परिस्थितीतही आईने नीता हिला बी. व्ही .बेल्लद लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यास सांगितले. त्यानंतर नीताने लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व जिद्दीने अभ्यास सुरू केला. शिक्षण घेत असतानाच विवाहसाठी स्थळ आले. त्यावेळी मला शिक्षण पूर्ण करायचे असे तिने सांगितले. त्यावर माहिपाळगड येथील भोगन कुटुंबीयांनी विवाह झाल्यानंतरही शिक्षण पूर्ण करण्यासाठी आम्ही सहकार्य करू असे सांगितले. मुलीसाठी स्थळ चांगले आल्याने आई वडिलांनी मुलीचे लग्न करण्याचे ठरविले. आई-वडिलांनी नीता हिला बोलून दाखवल्यानंतर विवाह करण्यास ती तयार झाली. विवाह झाला त्यानंतर पती अभिजीत भोगण व कुटुंबीयांनी शिक्षणाची थोडी जबाबदारी घेतली. सासरच्यानेही सर्व ते सहकार्य केले. त्यामुळे आज मी वकील बनले असे नीता हिने सांगितले .
वडील उत्तम स्वयंपाकही
परिस्थिती गरीब असल्यामुळे केवळ शेतीच्या उत्पादनावर सर्व गरजा भागणे अशक्य होते. त्यामुळे वडील विनोद पवार हे शेतीबरोबरच लग्न तसेच इतर समारंभांमध्ये स्वयंपाकी म्हणून काम करत असतात .ते एक उत्तम स्वयंपाकी म्हणून ओळखले जातात.त्यामुळे अनेक जण त्यांना स्वयंपाक करण्यासाठी बोलवतात .त्यामधूनही काहीतरी रक्कम मिळेल या आशेने ते स्वयंपाक करण्यासाठी जात असतात तोही व्यवसाय त्यांनी जोपासला आहे .