आज दिनांक 10/07 रोजी गुरु पौर्णिमेचे औचित्य साधून चव्हाट गल्ली येथील मराठी शाळा नं. 5 आणि माजी विद्यार्थी संघाच्या वतीने गुरुवंदना कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. आजच्या कार्यक्रमाला सर्व पालक आणि विद्यार्थी पारंपारिक वेशभूषेत हजर होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेतील सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी गल्लीमध्ये आषाढी दिंडीची फेरी काढली यामध्ये सर्व विद्यार्थी टाळ वाजवत ज्ञानोबा माऊली तुकाराम घोष करत उत्साहाने सहभागी झाले. त्यानंतर शाळेच्या आवारामध्ये रिंगण घालून विद्यार्थ्यांनी दिंडीचा आनंद सर्वतोपरी लुटला.
त्यानंतर शाळेमध्ये मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी श्री दीपक किल्लेकर हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य श्री आनंद आपटेकर हे उपस्थित होते. प्रारंभी सर्व उपस्थित मान्यवरांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले यानंतर विविध मान्यवरांनी गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन गुरुपौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित केले.
यावेळी बोलताना प्रमुख पाहुणे गुरुकुल पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य आनंद आपटेकर यांनी मुलांना गुरुचे महत्व व शालेय जीवनामध्ये आपण कशा रीतीने अभ्यास करावा तसेच मातृभाषेच्या शिक्षणातून होणारे फायदे याविषयी माहिती दिली व मोबाईल पासून लांब राहण्याचा प्रेमाचा सल्लाही दिला.
त्यानंतर श्री मुचंडीकर सर यांनी देखील मुलांना मार्गदर्शन केले व गुरुचे महत्व सांगत गुरूंच्या मार्गदर्शनाने आपली उन्नती करून घेण्याचा सल्ला दिला.
आपल्या अध्यक्षीय भाषणात श्री दीपक किल्लेकर सर यांनी देखील गुरुपौर्णिमेचे महत्त्व तसेच गुरु शिष्य परंपरा याविषयी मुलांना मार्गदर्शन केले. आपल्या आयुष्यात ज्या ज्या व्यक्तींच्या मुळे आपल्याला शिकायला मिळते ते सर्व आपले गुरु असतात आणि त्यातूनच आपली प्रगती होत असते असे मनोगत व्यक्त केले.
यानंतर कार्यक्रमामध्ये सर्व मुलांच्याकडून उपस्थित सर्व पालक तसेच सर्व मान्यवर आणि गुरुजनांच्या पाद्यपूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी सर्वच विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने आपल्या आई-वडिलांच्या तसेच गुरुजनांच्या आशीर्वाद घेतले. एकूणच मराठी शाळेतील आजचा हा गुरुवंदना कार्यक्रम सर्व पालक आणि विद्यार्थ्यांच्या कडून अतिशय उत्साहाने आणि जोमाने साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री नाथबुवा सर यांनी केले. सूत्रसंचालन श्री पी ए माळी सर आणि आभार श्री राजू कांबळे सर यांनी मानले.
या कार्यक्रमाला दीपक किल्लेकर, रवी नाईक, श्रीकांत कडोलकर, आनंद आपटेकर, माजी विद्यार्थी, क्रिकेट कोच विठ्ठल भट व एसडीएमसी चे सर्व पदाधिकारी, सर्व पालक आणि मुख्याध्यापक पी के मुचंडीकर, शाळेचे सर्व स्टाफ आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते..