खानापूर ग्रामीण भागातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या चांगल्या प्रमाणात आहे. मात्र शाळांमध्ये असलेल्या शिक्षकांच्या कमतरतेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने शिक्षकांची तातडीने नेमणूक करण्यास प्राधान्य द्यावे असे प्रतिपादन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य रणजीत पाटील यांनी केले आहे.
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीतर्फे गुरुवारी गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून खानापूर तालुक्यातील हलगा ग्राम पंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या गावातील सरकारी मराठी शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी हलगा येथील सरकारी शाळेमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमावेळी रणजीत पाटील यांनी समितीच्या प्रयत्नामुळे मराठी शाळांचे अस्तित्व टिकून आहे. समितीकडून मराठी शाळाना येणाऱ्या समस्या सोडवून घेण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. शैक्षणिक साहित्य वितरण करण्यासाठी अनेक शाळा भेट दिल्यानंतर काही शाळांमध्ये शिक्षकांची कमतरता असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी लवकरच गटशिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली जाईल असे मत व्यक्त केले.
गर्लगुंजी येथील समितीचे कार्यकर्ते सुनील पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. त्यानंतर मिलिंद देसाई, सुधिर देसाई, पुंडलिक पाटील, पुंडलिक देसाई यांच्या हस्ते शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वितरण करण्यात आले. तसेच मेंढेगाळी, हत्तरवाड, करजगी, मेरडा या गावामधील शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना साहित्य वितरण करण्यात आले. यावेळी आप्पांना इश्रान, लक्ष्मण रुपन, सहशिक्षिका जे पी कुंभार, के आर मंगूमाळी, एएस डी जाधव त्यांच्यासह शाळा सुधारणा कमिटीचे पदाधिकारी उपस्थित होते
सरकारी मराठी शाळेमधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वितरण
