चिखलणीचे काम आटोपून खांद्यावर जू असलेली बैलजोडी धुण्यासाठी तलावात सोडलेली असताना दोन्ही बैलांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना बेळगावातील बेकवाड (ता. खानापूर) येथे घडली. या घटनेत शेतकरी गुंजू विठ्ठल पाटील यांचे मोठे नुकसान झाले आहे.
बेकवाड येथे बंकी रस्त्यावर असलेल्या तलावात रोजगार हमी योजनेतून तलावाच्या खोलबंदीचे काम करण्यात आले आहे. नुकताच करण्यात आलेल्या या खोदाईच्या कामाची शेतकरी गुंजू पाटील यांना कल्पना नव्हती. तलावाच्या काठावर जेमतेम पाणी असेल असे समजून त्यांनी चिखलाने घाण झालेले बैले धुण्यासाठी तलावात सोडले. तलावातील खड्ड्याचा त्यांना अंदाज आला नसल्याने या खड्ड्यात पडून दोन्ही बैलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुर्घटनेत त्यांचे दीड लाखाचे नुकसान झाले आहे.