सीमाभागात कर्नाटक सरकारने सर्व सरकारी कार्यालय, तसेच सार्वजनिक ठिकाणी फक्त कन्नड भाषेमध्ये नामपलक लावण्याची सक्ती केली आहे.येथील मराठी व इंग्रजी नामफलक काढून त्या ठिकाणी फक्त कन्नड भाषेत नामफलक लावण्यात येत आहेत.तसेच सरकारी कामकाज कन्नड भाषेमध्ये करावे असे निर्देश देऊन त्याची आता अमलबजावणी होत आहे.यामुळे सीमाभागातील मराठी भाषकांची मोठी गैरसोय होत आहे. वादग्रस्त सीमाभाग हा सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रलंबित असून या ठिकाणी भाषिक अल्पसंख्याक आयोगाने कन्नड भाषेबरोबर मराठी भाषेतही फलक लावावेत, व कन्नड बरोबर मराठी भाषेतही सरकारी परिपत्रके द्यावीत असे निर्देश जारी केले आहेत. परंतु भाषिक अल्पसंख्याक आयोगाची या ठिकाणी पायामल्ली होताना दिसत आहे.
या भाषिक अन्यायाविरोधात मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने शुक्रवार दिनांक २५ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरवण्यात आले आहे. तरी या निवेदन देण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सर्व सभासदांनी, घटक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी, मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे,असे आवाहन मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर व सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी केले आहे.