बेळगावात कर्नाटक सरकार आणि प्रशासन मराठी भाषिकांवर अन्याय करत आहे. या गळचेपीविरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे तक्रार करा, अशी विनंती म. ए. समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गुरुवारी (दि. ३१) मुंबईत केली.कानडीकरणाबाबत प्रशासनाने केलेली अन्यायकारक कृतीची माहिती दिली. महापालिकेत याआधी मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेतून कागदपत्रे देण्यात येत होती. पण, आता संपूर्ण कानडीकरण करण्यात आले आहे. मराठी आणि इंग्रजी भाषेतील फलक हटवण्यात आले आहेत. मराठीत बोलण्यावरही अटकाव आणण्यात येत आहे. सीमाप्रश्न न्यायालयात असतानाही मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात वाचा फोडावी, अशी विनंती करण्यात आली.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून होत असलेला अन्याय दुर्दैवी आहे. याविरोधात मी पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करेन, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी महाराष्ट्रातील नेते समीत कदम हेही उपस्थित होते