‘संजय साबळे’ यांचा कर्नाटक साहित्य परिषदेच्या वतीने गौरव सोहळा
मराठी साहित्य, शिक्षण आणि सामाजिक चळवळीत आपल्या सातत्यपूर्ण सर्जनशील योगदानाने स्वतंत्र ओळख निर्माण करणारे दि न्यू इंग्लिश स्कूल, चंदगड येथील सहाय्यक शिक्षक मा. संजय गोपाळ साबळे यांचा कर्नाटक साहित्य परिषदेच्या वतीने नुकताच भव्य सत्कार करण्यात आला.
साहित्यसेवा, सामाजिक बांधिलकी आणि शिक्षक चळवळीत दिलेल्या योगदानाची दखल घेत कर्नाटक साहित्य परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सीमाकवी श्री. रविंद्र पाटील यांच्या हस्ते चंदगड तालुक्यातील कारवे येथील मुक्तछंद निवासस्थानी हा गौरवसोहळा संपन्न झाला.
हा सत्कार त्यांच्या नुकत्याच झालेल्या ‘अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद – कोल्हापूर जिल्हाध्यक्ष’ या सन्माननीय निवडीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आला.
या उल्लेखनीय निवडीनंतर संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याच्या साहित्य क्षेत्रात नवचैतन्याचे वारे वाहू लागले आहेत.
“ही निवड म्हणजे फक्त पदाची प्रतिष्ठा नव्हे, तर मराठी साहित्य आणि शिक्षण क्षेत्राला मिळालेला विश्वासाचा ठेवा आहे,” असे गौरवोद्गार श्री. रविंद्र पाटील यांनी यावेळी काढले.
मा. संजय साबळे सरांनी आजवर १७ हून अधिक पुस्तके, चारोळ्या, काव्य, विचारलेखन व प्रेरणादायी साहित्य सादर करून मराठी साहित्यविश्वात आपले ठसा उमटवला आहे.
त्यांच्या नावावर ९ जिल्हा व राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार आणि ३ साहित्य पुरस्कार असून, हे त्यांचे साहित्यिक योगदान आणि सेवाभाव अधोरेखित करते.
ते चंदगड मराठी अध्यापक संघाचे मार्गदर्शक असून, शिक्षक हक्कांसाठी आवाज उठवणारा एक समर्पित नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
या सन्मानप्रसंगी जोतिबा बडसकर, संध्या साबळे, शार्दुल साबळे व आर्या साबळे यांची उपस्थिती लाभली.
हा सन्मान म्हणजे चंदगडसारख्या सीमावर्ती भागातील साहित्यिक चळवळीला मिळालेला नवा ध्यास असून, त्यांच्यावर साहित्यिक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून अभिनंदनाचा आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.