बेळगाव, ता. 14 – बेळगाव जिल्ह्यातील प्रख्यात दलित नेते आणि सामाजिक कार्यकर्ते श्री मल्लेश चौगुले यांची ‘बौद्धविरासत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन भारत’ (बौद्ध गया बिहार) या संघटनेच्या राष्ट्रीय संयोजकपदी निवड करण्यात आली आहे.
श्री मल्लेश चौगुले हे मागील सुमारे 40 वर्षांपासून राष्ट्रीय पातळीवर सामाजिक कार्यात सक्रिय असून, त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना भारत सरकारचा राष्ट्रीय युवा पुरस्कार, कर्नाटक सरकारचा राज्य युवा पुरस्कार, कर्नाटक राज्योत्सव पुरस्कार
बेळगांव, तसेच मलेशिया येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार अशा अनेक सन्मानांनी गौरविण्यात आले आहे.
मुंबई येथील आंबेडकर भवनमध्ये झालेल्या विशेष बैठकीत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू डॉ. भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या उपस्थितीत निवड प्रक्रिया पार पडली. समिती सदस्य बनते सुमित रतन (बिहार) यांच्या हस्ते श्री मल्लेश चौगुले यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. महा बौद्ध महाविहार आंदोलनाच्या कोर कमिटी सदस्यांनी सर्वानुमते ही निवड केली.
नवीन जबाबदारीबाबत बोलताना श्री मल्लेश चौगुले म्हणाले, “ही फक्त पदाची निवड नसून, देशातील बौद्ध वारशाच्या संरक्षणासाठी आणि महाबोधी महाविहार (बौद्ध गया बिहार) मुक्तीसाठी लढा देण्याची ऐतिहासिक जबाबदारी आहे.” त्यांच्या या निवडीचे सामाजिक व बौद्ध समाजात मोठ्या प्रमाणावर स्वागत करण्यात आले आहे.