कोल्हापूर (प्रतिनिधी):मराठी भाषा, संस्कृती आणि परंपरेच्या संवर्धनासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद – कोल्हापूर जिल्हा शाखेच्यावतीने ‘१ले अखिल भारतीय कोल्हापूर मराठी साहित्य संमेलन – २०२५’ आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन रविवार, दि. २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाचे “विद्याभवन सभागृह”, राजर्षी शाहू साहित्य संमेलन नगरी, कोल्हापूर येथे भरणार आहे.
या ऐतिहासिक संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी मराठी साहित्य क्षेत्रातील प्रतिष्ठित, साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक श्री. कृष्णात खोत (कोल्हापूर) यांची निवड करण्यात आली आहे. मराठी साहित्याची परंपरा समृद्ध करणारे, लेखन-साधनेस जीवन समर्पित करणारे श्री. खोत यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन होणार आहे . तीन सत्रात संमेलन भरविले जाणार असून नवोदित कवींना संधी दिली जाणार आहे .
श्री. खोत यांनी यापूर्वी बेळगाव, कडोली, चिंचवड, भिलवडी, खानापूर, बलवडी, सावळज, बिसूर आणि उत्तूर येथे भरलेल्या विविध साहित्य संमेलनांमध्ये संमेलनाध्यक्ष म्हणून यशस्वी अध्यक्षता केली आहे.
मराठी साहित्यातील ग्रामीण वास्तवाचे सखोल आणि हृदयस्पर्शी चित्रण करणारे श्री. कृष्णात खोत हे प्रगल्भ साहित्यिक आहेत. त्यांच्या लेखनातून ग्रामीण जीवनातील संवेदना, संघर्ष, संस्कृती आणि अस्मिता यांचे प्रखर दर्शन घडते.
यावेळी अखिल भारतीय साहित्य परिषदचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलन आयोजित केले आहे . यावेळी परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष संजय साबळे व महिला जिल्हाध्यक्षा सौ. मनिषा डांगे तसेच मार्गदर्शक सीमाकवी रवींद्र पाटील व अर्जुन हराडे यांनी संमेलनाची माहिती दिली.
त्यांच्या प्रमुख कादंबऱ्यांमध्ये गावठाण, रौंदाळा, झड-झिंबड, धुळमाती, रिंगाण, काळ्यामाळ्या भिंगोळ्या आणि भिंतीत रचलेल्या दगडी डोळ्यांचे भगदाड यांचा समावेश आहे.नांगरल्याविन भुई हे त्यांचे शब्दचित्र तर आईबाईच्या नावानं हा कथासंग्रह विशेष गाजला आहे.
खोत यांना साहित्य अकादमी पुरस्कार (२०२३), महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) पुरस्कार (२०१९),भैरूरतन दमाणी पुरस्कार (२००८), आण्णा भाऊ साठे राज्य वाङ्मय पुरस्कार (२००६), ह. ना. आपटे राज्य वाङ्मय पुरस्कार (२०१७) व साने गुरुजी साहित्य पुरस्कार.
यामुळे मराठी साहित्य रसिकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.मराठी साहित्यातील नवचैतन्याचा उत्सव ठरणाऱ्या या संमेलनाला मान्यवर, साहित्यप्रेमी आणि विद्यार्थी यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.