बेळगांव ः बृहन्महाराष्ट्र मंडळ, नवी दिल्लीच्या वतीने घेण्यात आलेल्या मराठी निबंध स्पर्धा २०२४-२५ चा बक्षीस वितरण समारंभ येळ्ळूर येथील समाज शिक्षण संस्थेच्या महाराष्ट्र हायस्कूलमध्ये दि. २५ ऑगस्ट रोजी साजरा झाला. संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती लिला मेणसे अध्यक्षस्थानी होत्या.
संस्थेचे उपाध्यक्ष रवींद्र गिंडे, संचालक रावजी पाटील, पी. एन. मेणसे, तसेच मराठी भाषाप्रेमी मंडळ, बेळगांवचे अध्यक्ष अनिल चौधरी, कार्याध्यक्ष नितीन कपिलेश्वरकर, केंद्रप्रमुख बापूसाहेब देसाई, सचिव परशुराम माळी, शतक महोत्सव कार्यक्रम समितीचे पदाधिकारी सुहास गुर्जर, कुमार पाटील, प्रभाकर हलगेकर, शिवराज पाटील, विलास पेडणेकर आदी उपस्थित होते.
मुख्याध्यापक बबन कानशिडे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले. त्यानंतर सर्व पाहुण्यांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले .
शाळेतील श्रेया पुंडलिक चौगुले व रचना हणमंत बस्तवाडकर या विजेत्या विद्यार्थिनींना रोख बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी बोलताना अनिल चौधरी म्हणाले, मराठी भाषाजन व येळ्ळूर गावचे अतूट नाते आहे. शालेय जीवनात रामायण महाभारत तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वाचा सखोल अभ्यास करुन त्यांचे आचरण करावे. पुस्तकांचे वाचन मनन चिंतन केल्याने स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडून येतो.
मुख्याध्यापक बबन कानशिडे, निबंध स्पर्धा मार्गदर्शक शिक्षिका के. बी. पोटे व लता बस्तवाडकर यांचेही त्यांनी कौतुक केले. तसेच शाळेच्या प्रगतीबद्दल अभिनंदन करुन शुभेच्छा व्यक्त केल्या.
शिक्षिका सौ. के. बी. पोटे यांनी आभार मानले.
मराठी भाषा निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण
