बेळगाव तालुक्यातील जाफरवाडी येथे विवाहितेने क्षुल्लक कारणातून गळफास घेऊन आत्महत्या केली. कोमल प्रकाश पाटील (वय २७, रा. जाफरवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास घडलेल्या या घटनेची काकती पोलिसांत नोंद झाली आहे.
याबाबत माहिती अशी की, कोमल हिचे लग्न होऊन पाच वर्षे झाली असून तिला एक मुलगा आहे. तिचे माहेर कंग्राळी खुर्द असून सासर
जाफरवाडी आहे. तिला वडगाव येथे काकूकडे जायचे होते. यासाठी तिने पतीकडे तिकडे नेऊन सोडण्याचा हट्ट धरला. पती व्यावसायिक असल्याने आता मी कामात आहे, यातून रिकामा झालो की सोडेन, असे सांगितले. परंतु, हीच बाब मनाला लावून घेत रागाच्या भरात तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार नोंद झाली असून निरीक्षक सुरेश शिंगे तपास करत आहेत. तिच्या पश्चात पती, दोन मुले, सासू-सासरे, आई-वडील, भाऊ, दीर, जाऊ आहे
जाफरवाडी येथे विवाहितेची आत्महत्या
