लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या आरोपातून शहापूरमधील एकाची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. भरत मारुती शिंदे (रा. नवी गल्ली, शहापूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर शहापूर पोलिस ठाण्यात पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाला. मात्र, साक्षीदारातील विसंगतीमुळे विशेष पोक्सो न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली.
भरतवर अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप होता. त्याने अल्पवयीन मुलीशी मैत्री करुन तुझ्याशी लग्न करणार असे सांगून बलात्कार केला. त्यानंतर त्या मुलीला मुलगाही झाला. मात्र, हा मुलगा
आपला नसल्याचे सांगत संशयिताला लग्नाला नकार दिला. सदर अल्पवयीन मुलीवर बेळगाव, कोल्हापूर या ठिकाणच्या लॉजवर नेऊन बलात्कार केल्याची फिर्याद शहापूर पोलिस ठाण्यात मुलीच्या आईने दिली होती. याप्रकरणी शहापूर पोलिसांनी भरत याच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी विशेष जिल्हा पोक्सो न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. याप्रकरणी न्यायालयात ६ साक्षी, ९ कागदपत्रे पुरावे व मुद्देमाल तपासण्यात आले. मात्र, साक्षीदारातील विसंगतीमुळे न्यायालयाने संशयिताची निर्दोष मुक्तता केली.