No menu items!
Monday, January 12, 2026

कॅपिटल वन मराठी एकांकिका स्पर्धा जाहीर

Must read

कॅपिटल वन संस्थेतर्फे सातत्याने 14 व्या वर्षी आंतरराज्य एकांकिका, आंतरशालेय (बेळगाव जिल्हा मर्यादित) एकांकिका स्पर्धा जाहीर करण्यात आल्या असून नाट्यरसिकांना व कलाकारांना नाट्यपर्वणी ठरणाऱ्या या स्पर्धांना उदंड प्रतिसाद देऊन सहकार्य करावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन श्री शिवाजीराव हंडे यांनी पत्रकाद्वारे केले आहे.
टेलिव्हिजन, मोबाईल व इंटरनेटच्या या युगामध्ये नाट्यकलाकार व रसिकांना रंगभूमीपासून वंचित राहावे लागत होते. याबरोबरच जाचक कराच्या नियमावलीमुळे व्यवसायिक नाट्यकर्त्यांनी देखील आपल्या परिसरास पाठ फिरविली आहे. अशा परिस्थितीमध्ये संस्थेने नवनवीन कलाकार व नाट्यरसिक यांच्यामधील दुरावा काही अंशी कमी करून रंगमंच उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे.
आजवर महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक या तिन्ही राज्यांतून शेकडो नाट्यसंघांनी या स्पर्धेमध्ये भाग घेऊन स्पर्धेचा दर्जा, परीक्षण व आयोजनाबद्दल समाधान व्यक्त केले आहे.
आपल्या परीसरातून नवनवीन कलाकार, दिग्दर्शक, लेखक निर्माण व्हावेत या हेतूने आंतरशालेय एकांकिका स्पर्धेची सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे स्थानिक युवावर्ग मोठ्यां प्रमाणात आकर्षित होऊन नाट्यप्रपंचास भक्कम अशी उभारी मिळेल असेही नमूद करण्यात आले आहे.
सदर स्पर्धेचे आयोजन दि.20 व 21 डिसें 25 या कालावधीत लोकमान्य रंगमंदिर येथे करण्यात आले आहे.
स्थानिक कलाकारांना आवाहन
बेळगाव, वैभवशाली परिसराला लाभलेल्या नाट्यपरंपरेबरोबरच बेळगावची नाट्यकलादेखील पिढीजात आहे. पण नवनवीन कलाकारांना योग्य ते मार्गदर्शन न मिळाल्यामुळे ते रंगभूमीपर्यंत पोहचू शकत नाहीत. अशा सर्व कलाकारांनी आपला संघ स्पर्धेत उतरवावा, सदर संघांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी तज्ञ समितीची नियुक्ती करण्यात येणार असून सर्व संघांना ते विनामूल्य मार्गदर्शन करतील.
सदर स्पर्धा शनिवार दि. २०-१२-२०२५ व रविवार दि. २१-१२-२०२५ या दोन दिवसात बेळगाव येथील लोकमान्य रंगमंदिर येथे संपन्न होणार आहेत. स्पर्धेसाठी आवश्यक असणारा प्रवेश अर्ज हा संस्थेच्या सर्व शाखांसहीत संकेत स्थळावरून स्पर्धक संघ मिळवू शकतील. दि ५ डिसेंबर २०२५ ही प्रवेश अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख असेल.
स्पर्धेच्या आयोजनासाठी संचालकांसह प्रा. संध्या देशपांडे, निळुभाऊ नार्वेकर, प्रा. सुभाष, सुंठणकर यांचे सहकार्य लाभत असल्याचे चेअरमन श्री हंडे यांनी सांगितले. यावेळी संचालक शिवाजीराव अतिवाडकर, शामराव सुतार, रामकुमार जोशी, सदानंद पाटील, शरद पाटील, संजय चौगुले, भाग्यश्री जाधव, नंदा कांबळे, लक्ष्मीकांत जाधव उपस्थित होते.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!