बेळगाव : भारत व श्रीलंका लष्कराच्या ‘मित्र शक्ती-2025’ या संयुक्त सरावाला सोमवारपासून (दि. 10) बेळगावात प्रारंभ झाला. हा सराव 23 नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. दोन्ही देशांच्या एकूण 305 सैनिकांनी या सरावात भाग घेतला आहे.
भारताकडून राजपूत रेजिमेंटच्या 170 जवानांनी सहभाग घेतला आहे. तर श्रीलंकन लष्कराच्या तुकडीमधून गजाबा रेजिमेंटचे 135 जवान सहभागी झाले आहेत. याशिवाय भारतीय वायुसेनेचे 20 आणि श्रीलंकन वायुसेनेचे 10 अधिकारीही सरावात सहभागी झाले आहेत. या सरावाचा मुख्य उद्देश दहशतवादविरोधी संयुक्त कारवाईची तयारी, दोन्ही देशांतील संबंध सुधारणे हा आहे. सरावात युद्धकौशल्याचे प्रात्यक्षिक सादरीकरण, आर्मी मार्शल आर्ट्स, शुटिंग आणि योग यांचाही समावेश सरावात करण्यात आला आहे. या सरावात ड्रोन, काउंटर अनमॅन्ड एरियल सिस्टिम्स आणि हेलिकॉप्टरच्या वापरावरही भर दिला जाणार आहे. तसेच हेलिपॅड सुरक्षा, कॅज्युअल्टी इव्हॅक्युएशन (जखमी जवानांची सुरक्षित सुटका) यांसारख्या कृतींचा संयुक्त सराव दोन्ही देशांच्या सैन्यांकडून केला जाईल.



