वाहतूक नियमांचे उल्लंघन केलेल्या वाहनचालकांना टीएमसीमधून दंडाचे ऑनलाईन चलन पाठविले आहेत. तशा वाहनचालकांना ५० टक्के दंड भरण्याची शुक्रवार दि. १२ डिसेंबर ही अखेरची तारीख आहे. त्यामुळे वाहनचालकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन पोलीस आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.
यापूर्वी वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांना रहदारी पोलीस विविध ठिकाणी थांबून स्पॉट फाईन घालत होते. मात्र बहुतांशजण पोलिसांना चकवा देत आडमार्गाने पलायन करत होते. तशा वाहनचालकांवर नजर ठेवण्यासाठी शहर व उपनगरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्या माध्यमातून वाहनांचे नंबर टिपून त्यांना दंडाच्या नोटिसा पाठविल्या जात आहेत. बहुतांश वाहनचालकांनी दंड भरण्याकडे दुर्लक्ष केले असल्याने कोट्यवधी रुपयांचा दंड थकीत आहे. त्यामुळे सरकारने वाहनचालकांना भरण्यासाठी ५० टक्के सवलत दिली आहे. शुक्रवार हा अखेरचा दिवस असल्याने वाहनचालकांनी दंडाची रक्कम भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे



