दुर्गसंवर्धनात अग्रेसर असणारी शिवाजी ट्रेल संस्था आणि किल्ले संवर्धन समिती यांच्यावतीने आयोजित करण्यात आलेला ऐतिहासिक दुर्ग पूजा सोहळा बेळगाव येथील भुईकोट किल्ल्यावर रविवारी उत्साहात पार पडला. शिवाजी ट्रेल संस्थेचे दुर्गपुजेचे हे बाविसावे वर्ष असून या एकाच दिवशी महाराष्ट्रासह भारतीतील इतर नऊ राज्यातील १३१ हून अधिक गड-किल्ल्यांवर तसेच परदेशातील ६ किल्ल्यांवर एकाच वेळी विविध सरदार, संस्थानिक आणि राज घराण्यातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत ऐतिहासिक दुर्ग पूजा करण्यात आली.
निपाणी येथील ऐतिहासिक निबाळकर सरदार घराण्याचे वंशज दादासाहेब निबाळलकर आणि शिवाजी ट्रेलचे संयोजक रमेश रायजादे सुनील जाधव, परशराम मुरकुटे यांच्या हस्ते किल्ल्यावरील लेण्यांमध्ये असणाऱ्या ध्वज व दुर्ग पूजा संपन्न झाली.
यावेळी विजय बोगाळे, आदित्य जाधव, रामकृष्ण सांबरेकर, यांसह शिवप्रेमी आणि दुर्गप्रेमी उपस्थित होते. दुर्ग संवर्धन कार्याला बळकटी मिळावी, सर्वसामान्य नागरिक आणि शिवभक्त गड-किल्ल्यांकडे आकर्षित व्हावेत, प्रत्येक्ष गड-किल्ल्यांवर उपस्थित राहावेत, त्यांना गड-किल्ले पाहण्याची आणि त्यातून नंतर त्यांच्यात दुर्गसंवर्धनाची गोडी निर्माण व्हावी, या उद्देशाने शिवाजी ट्रेल या संस्थेच्यावतीने सुमारे बावीस वर्षांपूर्वी प्रत्यक्ष गड-किल्ल्यांवर जाऊन दुर्गपूजेचा उपक्रम सुरु करण्यात अला, अशी माहिती शिवाजी ट्रेलचे रमेश रायजादे यांनी दिली.
बावीस वर्षांपुर्वी सुरू करण्यात आलेली दुर्ग पूजा ही 2013 पर्यंत एकाच गडावर ठरलेल्या वेळी संस्थेचे सर्व सभासद एकत्र जमत असत व दुर्गपूजा करत असत. मात्र संस्थेच्या सभासदांची वाढती संख्या लक्षात घेता 2013 नंतर एकाच वेळी विविध गड-किल्ल्यांवर दुर्गपूजा करण्याचे नियोजन संस्थेच्यावतीने करण्यात आले. त्यानुसार 2014 पासून संस्थेच्यावतीने एकाच वेळी विविध गड-किल्ल्यांवर दुर्गपूजेचे आयोजन करण्यास सुरुवात केली. 2014 मध्ये 14 गड-किल्ल्यांवर तर 2015 मध्ये 81 गड-किल्ल्यांवर फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या रविवारी दुर्गपूजा संपन्न झाली. फक्त महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांवर होणारी शिवाजी ट्रेलची ही दुर्गपुजा 2016 मध्ये महाराष्ट्रासह दिल्ली, राजस्थान, पंजाब, केरळ आणि तामिळनाडू मधील 121 गड-किल्ल्यांवर संपन्न झाली, त्यात विविध सरदार आणि संस्थानिक घराण्यातील वंशज सहभागी झाले होते. 2016 च्या दुर्गपुजेची दखल लिम्का बुक ऑफ रेकॉर्डने घेत विक्रमाची नोंद केली होती. 2017 मध्येही देशभरातील 123 किल्ल्यांवर एकाच वेळी दुर्ग पूजा करण्यात आली होती. 2018 मध्ये देशभरातील 125 किल्ल्यांसह प्रथमच विदेशातील सिंगापूर येथील दोन किल्ल्यावर दुर्गपुजा करण्यात आली होती, अशी माहिती निपाणीचे दादासाहेब निंबाळकर यांनी दिली.