मिरज (जि. सांगली) येथे गंगाधर साहित्य परिषद, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित मराठी साहित्य संमेलन आज दि.९ ऑक्टोबर रोजी पटवर्धन हॉल येथे उत्साहात पार पडले. या संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक भिमराव धुळुबुळू यांनी भूषविले, तर उद्घाटन सोहळा डॉ. श्रीपाल सबनीस (अध्यक्ष, ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन) व साहित्यिक किसनराव कुराडे यांच्या हस्ते पार पडला.
या भव्य संमेलनात परिषदेतर्फे “राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार” प्रदान करून सीमाकवी रवींद्र मारुती पाटील व रोहिणी रवींद्र पाटील यांचा सपत्नीक गौरव करण्यात आला.
रवींद्र पाटील हे राजर्षी शाहू विद्यालय, शिनोळी बुद्रुक (ता. चंदगड, जि. कोल्हापूर) येथे अध्यापक म्हणून कार्यरत असून विद्यार्थीप्रिय, तंत्रस्नेही आणि उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. ते मूळचे कुद्रेमानी (ता. बेळगाव) येथील असून सीमाभागातील शैक्षणिक व साहित्यिक चळवळीत सक्रीय योगदान देतात.
ते अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कर्नाटक राज्याचे राज्याध्यक्ष तसेच को-जिम व चंदगड तालुका मराठी अध्यापक संघाचे तालुका समन्वयक म्हणून कार्यरत आहेत.
साहित्य, समाजसेवा, शिक्षण आणि संस्कृती या चार क्षेत्रांचा संगम त्यांच्या कार्यात दिसून येतो.
सीमाप्रश्न, मराठी अस्मिता आणि समाजातील वास्तव या विषयांवर त्यांच्या काव्यातून तीव्र व संवेदनशील विचार मांडले जातात.
एक सीमा कवि म्हणून त्यांनी बेळगाव सीमाभागाचा आवाज राज्यभर पोचविला आहे.
अशा कार्यतत्पर, जिद्दी आणि समाजाभिमुख शिक्षकाला गंगाधर साहित्य परिषदेने सन्मानित केल्याने शिक्षक व साहित्यवर्तुळात आनंदाची लाट उसळली आहे.
संमेलनाचे यशस्वी आयोजन परिषद अध्यक्ष पत्रकार कवी कमलाकर वर्टेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.
कार्यक्रमास अनेक मान्यवर, साहित्यिक, कवी, शिक्षक आणि रसिक प्रेक्षक उपस्थित होते.