परिवहन विभाग लवकरच बेळगाव येथे ऑटोमेटेड ड्रायव्हर टेस्टिंग ट्रॅक विकसित करणार आहे. बेळगाव बरोबरच मंगळूर आणि रायचूर येथील तीन आरटीओ खात्यामध्ये ड्रायव्हिंग लायसन्स जारी करण्याच्या चाचणीत सुसूत्रता आणली जाणार आहे. या सर्व आरटीओमध्ये ऑटोमेटेड ड्रायव्हर टेस्टिंग ट्रॅक (एडीटीटी) मिळणार आहेत.
या पद्धती मुळे ड्रायव्हिंग कार्यक्षमता आणि कौशल्यांचा निर्णय मनमानीपणे घेता येणार नाही. यामुळे योग्य वाहन चालवून ही नापास ठरविले जाणे टाळता येणार आहे.
सर्व प्रादेशिक परिवहन कार्यालये (आरटीओ) एडीटीटीने सुसज्ज करण्याच्या प्रकल्पाची घोषणा २०२० मध्ये तत्कालीन परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी केली होती. सध्या इलेक्ट्रॉनिक सिटी, ज्ञानभारती, गुलबर्गा, म्हैसूर, शिमोगा, हसन आणि धारवाड येथील आरटीओमध्ये ए.डी.टी.टी. उपलब्ध करण्यात आले आहेत
‘नियमानुसार १६ निकषांच्या आधारे चालकाचे कौशल्य आणि कार्यक्षमतेचे मूल्यमापन केले जाते. पात्रता पूर्ण करण्यासाठी १५ निकष पूर्ण करावे लागतात. मात्र, अकुशल वाहनचालकांना बेकायदेशीरपणे पास केले जाते, परिणामी रस्त्यांवर अपघात होतात, अशी नेहमीची तक्रार आहे. ए.डी.टी.टी. एक संगणकीकृत प्रणाली आहे, जी ड्रायव्हरच्या कौशल्यावर निर्णय देते यामुळे इन्स्पेक्टरच्या निर्णयावर पास किंवा नापास ठरले जाण्याची शक्यता कमी करण्यास मदत करते,असे एका अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
मंगळुर येथे एडीटीटी उभारण्याचा अंदाजे १० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, आरटीओच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “सेन्सर बसविण्यासाठी निविदा द्यावी लागेल, त्यानंतर उर्वरित कामे एका महिन्यात पूर्ण केली जातील.
बेळगाव एडीटीटीचे काम, अंदाजे 8.05 कोटी रुपये खर्चाचे असून पूर्ण होण्याच्या अंतिम टप्प्यात आहे. एका अधिकाऱ्याने सांगितले की, सेन्सरचा पुरवठा आणि इतर टेंडरची फाईल सरकारला मंजूर करावी लागेल. अधिकाऱ्यांनी सांगितले की रायचूरमधील एडीटीटीच्या कामासाठी आणखी सहा महिने लागू शकतात.
“महामारीच्या काळात भूसंपादन आणि कामगारांशी संबंधित मुद्द्यांमुळे काही बांधकाम कामांना उशीर झाला. सेन्सर बसविण्यासाठी निविदा प्रक्रियेला गती देण्याची गरज आहे. हे तिन्ही ट्रॅक सहा महिन्यांत तयार होऊ शकतात,” असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
एडीटीटींनी केवळ अनियमितताच कमी केली नाही तर प्रक्रियेस गती दिली. ‘मंगळुरसारख्या ठिकाणीही दररोज सुमारे ८० ते १०० चाचण्या होतात. सर्व कामे सुरळीत करण्यासाठी प्रक्रिया सुव्यवस्थित करणे महत्वाचे आहे. या मोहिमेचे मूल्यमापन जलद गतीने करण्यासाठी हा विभाग बेंगळूर येथील पिन्यामध्ये बीएमटीसीने तयार केलेल्या चाचणी ट्रॅकचाही वापर करीत आहे,’ असे एका अधिकाऱ्याने सांगितले.