सरकारी शाळांमधील शिक्षकांची कमतरता २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापर्यंत दूर होण्याची शक्यता आहे. कमी पडत असलेली शिक्षकांची संख्या लवकरात लवकर भरून काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्राथमिक व माध्यमिक शिक्षण विभागाने इयत्ता ६ वी ते ८ वी साठी १५ हजार शिक्षकांची भरती करण्याची प्रक्रिया सुरू केली असून संबंधित अधिसूचना २१ मार्च रोजी काढण्यात येणार आहे. पात्र उमेदवार २३ मार्चपासून ऑनलाइन अर्ज करू शकतात.
शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना प्राथमिक व माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश म्हणाले की, ऑनलाइन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २२ एप्रिल आहे.
“शिक्षक भरतीसाठी सामायिक प्रवेश परीक्षा २१ आणि २२ मे रोजी घेण्यात येईल,” असेही मंत्री म्हणाले.
विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, सर्वाधिक गणित विषय शिक्षकांची कमतरता असून, त्यात एकूण २१ हजार पदे रिक्त आहेत. यामध्ये विभाग यंदा सहा हजार पदे भरणार आहे.
” इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकवण्यासाठी सद्या सुमारे 30,000 शिक्षकांची कमतरता आहे. दरम्यान सर्वप्रथम इयत्ता ६ ते ८ वी मधील रिक्त पदे भरली जाणार आहेत.
शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण झालेले दीड लाखाहून अधिक पात्र उमेदवार असले, तरी विविध निर्बंधांमुळे विभाग ही पदे भरू शकत नाही आणि विनंत्या लक्षात घेता विभागाने काही सवलती दिल्या आहेत.
या सवलतींमध्ये सर्व प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सूट देण्यात आली आहे. एससी-एसटी समुदायासाठी वयोमर्यादा 45 वर्षांवरून 47, इतर मागास समाजांसाठी 43 वरून 45 पर्यंत शिथिल करण्यात आली असून सर्वसाधारण प्रवर्गासाठी ती 40 वरून 42 करण्यात आली आहे.