बिल्डर राजू दोड्डबोमण्णावर (४६) याच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि दोन बिझनेस पार्टनरना अटक केली आहे. ही हत्या 15 मार्च रोजी येथील मंडोळी रोडपासून जवळच भवानी नगरजवळ घडली. आता पोलीस हा गुन्हा करणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट किलर्सचा शोध घेत आहेत.
मृताची पत्नी किरण दोड्डबोमण्णावर (२६) आणि त्याचे दोन व्यावसायिक भागीदार- हिंदवाडी येथील रहिवासी शशीकांत शंकरगौडा (४९) आणि ओम नगर, खासबाग येथील धरणेंद्र घंटी (५२) हे अटक करण्यात आलेले आरोपी आहेत.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी किरण ही मृताची दुसरी पत्नी आहे. राजूने किरणला त्याच्या पहिल्या लग्नाची माहिती न देता लग्न केले होते. धक्कादायक म्हणजे राजूने दोन्ही माजी पत्नींच्या संमतीशिवाय आणखी एक तिसऱ्या मुलीशी लग्न केले. त्याच्या पहिल्या दोन पत्नींना प्रत्येकी दोन मुले आहेत आणि तिसरी पत्नी आता गर्भवती आहे. किरण निराश झाली होता आणि तिला फसवल्याबद्दल तिचा नवरा राजूवर रागावली होती.यातूनच त्याचा सूड घेण्याचा कट तिने रचला होता.
तर दुसरीकडे राजूचे त्याच्या दोन बिझनेस पार्टनरसोबतचे संबंधही आर्थिक अडचणींमुळे बिघडले होते. हे तिघे चन्नम्मा नगर येथे ३६ फ्लॅटचे अपार्टमेंट बांधत होते, पण राजूने असहकार केल्यामुळे काम अर्धवट थांबले होते.
किरणला तिच्या पतीचा व्यवसायातील भागीदारांशी असलेला वाद जाणवला आणि त्यांची भेट घेतली. त्यांनी राजूला ठार मारण्याचा कट रचला आणि व्यावसायिक कॉन्ट्रॅक्ट किलरशी संपर्क साधला. ज्या कॉन्ट्रॅक्ट किलर्सनी 10 लाख रुपये आगाऊ घेतले होते, त्यांनी राजूवर हल्ला करण्याचा प्रयत्न यापूर्वीही केला होता, पण तो निष्फळ ठरला. मात्र, १५ मार्चला त्यांनी ते करून दाखवले. त्यांनी राजूची गाडी अर्ध्यावरच अडवली, त्याच्या तोंडावर मिरची पावडर शिंपडली आणि नंतर धारदार शस्त्रांनी हल्ला केला.यात त्याचा मृत्यू झाला.