बेळगाव :
एम के पाटील
दिनांक 26 जानेवारी रोजी सकाळी साडे सहा वाजता यशवंतनगर येथील दहावीत शिकणारा ग्लेन पास्कल फर्नांडिस आपल्या कुत्र्याला घेऊन जवळच असणाऱ्या तुर्केवाडी हद्दीतील पाटील यांच्या शेतावरच्या टेकडीवर फिरावयास गेला होता. तो किंवा त्यांचे वडील रोज सकाळ संध्याकाळ कुत्र्याला घेऊन फिरायला त्याच मार्गाने जातात. यशवंतनगरमध्ये बहुतांश लोक बाहेरुन येऊन स्थाईक झालेले नोकरदार असल्याने ते व्यायाम आणि फिरण्यासाठी परिसरात जातात. त्या दिवशी प्रजासत्ताक दिन असल्याने ग्लेनला शाळेवर झेंडावंदनाला जायचे असल्याने नेहमीपेक्षा थोड्या लवकरच फिरायला गेला होता. त्याच्या हातात नेहमी प्रमाणे कुत्रा होता. फिरत फिरत तो बरोबर सकाळी साडे सहा वाजता तुर्केवाडी हद्दीतील पाटील यांच्या शेतातील टेकडीवर आला.टेकडीवर गवत आणि झाडेझुडपे आहेत. टेकडी मधोमध आहे आणि सभोवताली काजूची बाग आहे. टेकडीच्या उतरणीला खाली एक कच्चा रस्ता जातो. रस्त्याच्या अगदी समोरच पाटील यांचे एक नव्यानेच बांधलेले फार्महाऊस आहे. तो कुत्र्याला घेऊन नेहमीच त्या घरापाशी घुटमळत असे. त्या दिवशी धुके होते. घरापाशी जवळ कुत्रा घेऊन गेल्यानंतर त्याची नजर अचानक त्या घराच्या व्हरांड्याकडे जाते आणि त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकतो. त्या घराच्या व्हरांड्यात एक काॅट ठेवलेली आहे. त्या काॅट शेजारीच त्याला जिभल्या चाटत बसलेला वाघ दिसतो. क्षणाचाही विलंब न करता ग्लेनने कुत्र्याला आहे त्या स्थितीत उचलुन घेत घराकडे धुम ठोकली. वाटेत घाबरुन तो एक दोन ठिकाणी पडलाही. घामाघुम झालेल्या अवस्थेत त्याने वाघ पाहील्याची बातमी आपल्या घरच्यांना दिली. जवळच बाजुला माजी सीआयडी पोलीस अधिकारी श्री गजानन मातोंडकरांचे घर आहे. त्यांना सदरची कल्पना ग्लेनच्या घरच्यांनी दिली. श्री मातोंडकर यांचे चिरंजीव कु. रोहन मातोंडकर याने तात्काळ वन विभागाला यशवंतनगर येथे वाघ दिसल्याची माहिती दिली.
काही वेळाने वन विभागाचे पथक यशवंतनगर येथे दाखल झाले. वन विभागाच्या पथकाने श्री मातोंडकर आणि स्थानिकांना घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. ज्या ठिकाणी फार्महाऊसवर वाघ दिसला होता त्या ठिकाणा पासुन हाकेच्याच अंतरावर हांजओहळ नदी आहे . या नदीला बारामाही पाणी असते. जंगहमट्टी येथील धरणावरुन वाहत येणारी ही नदी जंगहमट्टी, माडवळे, तुर्केवाडी, मुरकुटेवाडी, कार्वे व यशवंतनगर असा प्रवास करत पुढे जाऊन ताम्रपर्णी नदीला मिळते. टेकडीच्या जवळ असणाऱ्या नदी पलीकडे मुरकुटेवाडी आणि कार्वे गावे आहेत. त्या टेकडीवरुन ती गावे सहज दृष्टीस पडतात. पाटणे फाटा एम आय डी सी परिसरही तेथून दिसतो. नदीच्या दोन्ही बाजूंना विस्तृत पसरलेले सलग ऊसाचे मळे आहेत.यशवंतनगर आणि मुरकुटेवाडी यांच्या मधुन जाणारा ऊसाचा हिरवागार पट्टा थेट माडवळे आणि जंगमहट्टी गावांना लागुन असणाऱ्या जंगलापर्यंत जाऊन पोचतो.या मधल्या पट्ट्यात मनुष्यवस्ती अगदी किरकोळ आहे. हिरवागार आणि बारमाही पिकांनी वेढलेला हा पट्टा आहे. मध्येमध्ये झुडपे असणाऱ्या टेकड्याही आहेत. नदीच्या दोन्ही बाजूला वरवर गेल्यावर टेकडांवर वसलेल्या असंख्य काजूच्या बागा आहेत.
प्राण्यांना लपण्यासाठी आणि वास्तव्यासाठी हा पट्टा चांगला अधिवास आहे. चुकून माडवळे अथवा तिलारी-धामणे जंगलातुन आलेला प्राणी इथे एकदा आल्यास तो या पट्ट्यात रमतो. जंगलातून आलेले ससे, मोर, भेकर, डुक्कर इत्यादी प्राण्यांनी या पट्ट्यात कायमचाच मुक्काम ठोकला आहे. एकदोन वाघांना हवे असणारे भक्ष्य या पट्ट्यात आहे. लपण्यासाठी दुरवर सलग पसरलेले ऊसाचे मळे आहेत. त्यामुळे माणसांच्या दृष्टीस न पडता अनेक प्राण्यांचा इथला वावर नाकारता येत नाही.
वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाघ दिसलेल्या परिसराची पाहणी केली. फार्महाऊस पासुन लागुनच श्री अरुण पवार यांनी ऊसाची लागण केली आहे. परिसरात पायांचे ठसे मिळतात का याची पहिल्यांदा चाचपणी केली. ज्या व्हरांड्यात वाघ बसला होता त्या घरासमोर धुळीत आणि पवार यांच्या ऊसाच्या लागणमधील पाण्याच्या पाठात काही संशयास्पद ठसे अधिकाऱ्यांना आढळून आले. ऊसाच्या लागणीला नुकतेच पाणी दिले होते. पाण्याच्या प्रवाहामुळे पाठात वर गाळ साचला होता त्यामुळे वाघसदृष्य पायांचे ठसे स्पष्ट दिसत होते. वन अधिकाऱ्यांनी त्या सर्व ठस्यांचे फोटो घेतले आणि ग्लेनशी बोलणी केली. अधिकाऱ्यांनी काही फोटो ग्लेनला दाखवले त्यामध्ये तरस, बिबट्या आणि वाघांचे काही फोटो होते. त्यांनी त्याला त्यातील सकाळी पाहीलेला प्राणी दाखवायला सांगितले. क्षणाचाही विलंब न करता ग्लेनने वाघाच्या चित्राकडे बोट केले. यावेळी वन विभागाचे अधिकारीही गोंधळात पडले. सदर प्राणी परत दृष्टीस पडल्यास कळविण्याच्या व खबरदारी घेण्याच्या सुचना देऊन पथक माघारी फिरले.
26 जानेवारी रोजी दिवसभर परिसरात वाघ आल्याची चर्चा सुरू होती. वन विभागाकडून मात्र अधिकृत घोषणा करण्यात आली नव्हती. कारण वाघ एकट्याच्या नजरेस पडला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी पंचक्रोशीत पावलांच्या ठस्यांचे फोटो सोशल मिडियात फिरत होते. मात्र अद्याप याला दुजोरा मिळाला नव्हता. मात्र 27 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता एक विलक्षण घटना घडली. ज्या फार्महाऊसवर पहिल्यांदा वाघ नजरेस पडला होता. त्यापासून अवघे चार ते पाच मिनिटांचे पाई अंतर चालल्यास हाकेच्या अंतरावर यशवंतनगरची घरे सुरू होतात. ही वस्ती अलिकडे झाली आहे. वस्ती विरळ आहे आणि परिसर शांत आहे. डाॅ संजय मुरकुटे यांच्या दवाखान्याच्या समोरुन जाणारा पाणंद रस्ता या छोट्या वस्तीकडे जातो. वाटेत पहिल्यांदाच माजी पोलीस अधिकारी श्री. गजानन मातोंडकर यांचे घर उजव्या बाजूला लागते तेथून 50 पावलांच्या अंतरावर ही नोकरदारांची छोटीशी वसाहत आहे. पवार, भोपळे आणि बुरुड कुटूंबियांचीही घरे तेथे आहेत. रस्त्याला लागुन डाव्या बाजूलाच श्री पास्कल फर्नांडिस यांचे घर आहे. ते अॅटलास फेअरफिल्ड शिनोळी येथे नोकरीस आहेत. हे तेच पास्कल फर्नांडिस आहेत की ज्यांच्या दहावीत शिकणाऱ्या ग्लेन नावाच्या मुलाला पहिल्यांदा वाघ दिसला होता. रात्री आठच्या सुमारास पुर्ण अंधार पडला होता. ग्लेनने गॅलरीत बांधलेली आपली दोन कुत्री आत आणण्यासाठी घराचा दरवाजा उघडताच पुन्हा एकदा थरकाप उडवणारे दृष्य त्याच्या नजरेस पडले. पुन्हा एकदा वाघ त्याच्या समोर गॅलरीतील पायऱ्यावरुन वर येताना त्यांने पाहीला. भितीने त्याची भंबेरीच उडाली. ओरडून समोरच्या खिडकीतील गेलेला बल्ब त्यांने वाघाच्या दिशेने फेकला. ग्लेन ओरडलेला पाहून त्याची आई वेगाने दरवाजात आली. तोपर्यंत वाघ परतुन घरासमोर लावलेल्या वांग्याच्या झाडावरून उडी टाकून जाताना ग्लेनच्या आईने पाहीला. सदरची कल्पना ग्लेनच्या आईने श्री मातोंडकर यांच्या कुटुंबियांना फोनवरुन दिली. लगेच वन विभागाला कल्पना दिली. थोड्याच वेळात बातमी यशवंतनगर आणि कार्वे येथे समजली, मोठ्या संख्येने लोकही जमा झाले. अगोदरच वाघाची चर्चा झाली असल्याने मोठा जमाव जमला. सुरक्षेखातर लोकांनी बॅटऱ्या घेऊन परिसराचा मागही काढला मात्र काहीच नजरेस पडले नाही. परिसरात झाडेझुडपे असल्याने अंधारात काही दिसनेही शक्य नव्हते.
वन विभागाचे पथक पुन्हा काही वेळातच दाखल झाले. पथकाने परिसराची पाहणी करून पुन्हा ग्लेनच्या घरी भेट देऊन चौकशी केली. ग्लेन आपल्या मताशी ठाम होता. दिसलेला प्राणी पट्टेरी वाघच असल्याचे ग्लेन आणि त्याच्या आईने सांगितले. यानंतर पोलीस निरीक्षक तळेकर यांनी आणि वन विभागाने यशवंतनगर वैताकवाडी आणि तुर्केवाडी परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला. ती रात्र यशवंतनगर आणि विशेषतः नवीन वसाहत ज्या ठिकाणी वाघ दिसला होता त्या परिसरातील लोकांनी अक्षरशः जागुन काढली. वाघ दिसण्याच्या बातमीवर अनेकांनी उलट सुलट चर्चा सुरू केली. परिसरात आढळलेले पायांचे ठसे आजुबाजुच्या शेतकऱ्यांना दाखवल्यानंतर या प्रकारचे ठसे गेले वर्षभर ऊस आणि इतर पिकांमध्ये आढळत असल्याचे सांगतात. काही लोक दोन मोठे प्राणी आवाज करत ऊसात गेल्याचे सांगत आहेत. या परिसरातील दहाबारा भटक्या कुत्र्यांची संख्या दोनवर आल्याची चर्चा आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात आढळणारे मोर , ससे अखेर कुठे गेले असेही प्रश्न आत्ता समोर येत आहेत.कदाचित ते नव्या पाहुण्याने तरी फस्त केले नसतील अशी शंका परिसरातील लोकांना यायला लागली आहे
काहीजण वाघ नाहीच म्हणत आहेत. काहीजण वाघ फक्त ग्लेनलाच कसा दिसतो आणि त्याच्याच घरी कसा जाऊ शकतो असे प्रश्न विचारत आहेत. काहीजण तो बिबट्या असल्याचे सांगतात. तर काही लोक ग्लेनला भास होत असल्याचे बोलत आहेत. लोकांच्या प्रश्नांनी ग्लेन आणि त्यांच्या कुटुंबाला भंडावून सोडले आहे. ग्लेनला एकट्यालाच वाघ दिसतो आहे याची चर्चा सर्वत्र आहे . ग्लेन भितीने आणि या साऱ्या प्रकाराने आजारी झालाय. ग्लेनचे वडील निराश आहेत. लोक त्यांना उलटसुलट प्रश्न विचारत आहेत. माझ्या मुलावर वाघाने डुक तर धरला नसेल? या विचाराने ग्लेनचे कुटुंबीय दुःखी व काळजीत आहेत. ग्लेन आणि परिसरातील नागरिकांनी आत्ता फार्महाऊसकडे फिरायला जाणे बंद केले आहे. शेतावर माणसं काम करायला घाबरत आहेत. धाडसाने जाणारे सायंकाळी साडेपाचच्या आत परतत आहेत. रात्री पिकाला पाणी पाजायला जाणारेही घरीच विश्रांती घेत आहेत. बायकांनी त्या परिसरातील शेताची वाट सोडली आहे. वाघ कोणत्या तरी झुडपात सावलीत विश्रांती घेत बसला असेल हा विचार प्रत्येकाच्या मनात येत आहे. तो येईल आणि अंगावर झडप घालेल याचीही भिती प्रत्येकाला मनोमन वाटत आहे.