बेळगांव ः सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एक सनातनी वकील राकेश किशोर तिवारी याने बूट उभारुन हल्ला करण्याचा निंद्य प्रयत्न केला. त्याचा प्रगतिशील लेखक संघ व अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला.
दोन्ही संस्थांच्या शुक्रवारी झालेल्या संयुक्त बैठकीत एका ठरावाद्वारे हा निषेध करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्रा. आनंद मेणसे होते.
तिवारीवर त्वरित कायदेशीर कारवाई करुन त्याला अटक करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
दलित समाजातील भूषण गवई हे न्याय व्यवस्थेतील सर्वोच्च पदावर पोहोचलेले मनुस्मृती पुन्हा आणू पहाणाऱ्या मंडळींना खुपत आहे. त्यातूनच हे कृत्य घडले आहे. २०१४ साली भाजप सत्तेवर आल्यानंतर या प्रवृत्तीला बळ मिळाले आहे, असे मत यावेळी झालेल्या चर्चेत व्यक्त करण्यात आले.
गवई यांच्यावरील हल्ल्याच्या प्रयत्नाच्या
निषेधार्थ सोमवार दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला.
अनिल आजगावकर, कृष्णा शहापूरकर, ॲड. नागेश सातेरी, शिवलिला मिसाळे, जोतिबा अगसीमनी, अर्जुन चौगुले, ओऊळकर, मधु पाटील आदींनी चर्चेत भाग घेतला. बैठकीस बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.