ऋचा पावशे हिचा राज्यात प्रथम तर देशात चौथा क्रमांक
राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा अर्थात (NEET) परीक्षेत राज्यात प्रथम तर देशात चौथा क्रमांक प्राप्त करून उजगावची कन्या ऋचा पावशे हिने बेळगाव तालुक्यासह जिल्ह्याचे नाव उज्वल केले आहे. ऋचा ही डॉ. श्री. मोहन व डॉ. सौ. स्मिता पावशे यांची कन्या आहे. डॉ. पावशे हे मूळचे उचगाव (ता. बेळगाव) येथील आहेत. सध्या बेळगाव येथे त्यांचे वास्तव्य आहे.
दरम्यान (NEET) परीक्षेत मिळविलेल्या यशाबद्दल ऋचा आणि तिच्या कुटुंबियांशी संवाद साधला असता, या सर्वांनी यशाचे गमक सांगताना आपल्या भावना व्यक्त केल्या.
ऋचा पावशे : मी बेळगाव तालुक्यातील मराठी मुलगी असून नीट परीक्षेत यश प्राप्त करून बेळगाव तालुक्यासह जिल्ह्याचे नाव उज्वल केल्याचा अभिमान वाटत असल्याचे ऋचाने सांगितले. माझ्या यशात आजी-आजोबा, आई-वडील, भाऊ, शाळेतील शिक्षक- शिक्षिकांचे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे सांगून तिने सर्वांचे आभार मानले. नीट परीक्षेत निगेटिव्ह मार्किंग पद्धती अवलंबण्यात येते एखादे उत्तर चुकले तर मार्क वजा होतात याची भीती असते, याची भीती वाटली का असे विचारले असता निगेटिव्ह मार्किंग पद्धतीची भीती होती पण अभ्यासातील सातत्य, कठोर मेहनत आणि वडीलधाऱ्यांचा आशीर्वादामुळेच या परीक्षेला धैर्याने सामोरी गेले असे ऋचा म्हणाली. तसेच येत्या काळात नीट परीक्षा देणाऱ्यांसाठी जिद्द आणि चिकाटी बाळगून खूप अभ्यास करा स्वतःला वेळ द्या अशा शब्दात तिने मार्गदर्शन केले.
डॉ. सौ. स्मिता पावशे : ऋचाच्या यशाबद्दल आई सौ. स्मिता पावशे यांच्याशी संवाद साधला असता मुलगी ऋचा हिने प्राप्त केलेले यश शब्दात सांगणे कठीण असल्याचे त्या म्हणाल्या. ऋचाने कठोर परिश्रम घेऊन केलेल्या अभ्यासामुळे हे यश मिळाले असून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी ऋचाला पाठबळ दिल्याचे सांगितले.
डॉ. प्रथमेश पावशे : यावेळी ऋचाचे भाऊ डॉ.प्रथमेश पावशे यांनी बहिणीने मिळवलेल्या यशाचा अभिमान आहे. अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या. आम्ही तिच्याकडून भरपूर सराव करून घेतला होता. म्हणूनच ती एवढे मोठे यश प्राप्त करू शकली याचाही डॉ. प्रथमेश यांनी यावेळी आवर्जून उल्लेख केला. पणजोबा, आजोबा यांच्यानंतर आता आमची पिढी वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहे. उचगाव सारख्या ग्रामीण भागात जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली हे आपले भाग्य असल्याचेही ते म्हणाले.
दीपक पावशे : यावेळी दीपक पावशे यांनी ऋचाचे कौतुक करताना तिने मिळवलेल्या यशाचे कौतुक करण्यासाठी शब्द अपुरे पडतील असे सांगितले. आजपर्यंत पावशे घराण्याचे नाव राजकारणात महाराष्ट्र आणि कर्नाटकात माहित होते. पण ऋचाने शिक्षणक्षेत्रात कर्नाटक राज्यासह देशात पावशे घराण्याचे नाव उज्वल केल्याचा खूप अभिमान वाटत असल्याचे सांगितले.
ऋचा सेंट झेवियर्स, आरएलएस कॉलेजची विद्यार्थिनी आहे. या परीक्षेत तिने 720 पैकी 715 गुण मिळवून उज्वल संपादन केले आहे.