बेळगाव – आत्तापर्यंत सीमा प्रश्नी आडमुठी भूमिका घेणाऱ्या कर्नाटक सरकारला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या भूमिकेमुळे सणसणीत चपराक मिळाली आहे.कर्नाटकामधील आत्तापर्यंतच्या माजी व आजी मुख्यमंत्र्यांनी तसेच नेत्यांनी सीमा प्रश्न अस्तित्वातच नसल्याची री नेहमीच ओढली. सीमा प्रश्न संपला, बेळगाव हे कर्नाटकचे अविभाज्य अंग असल्याचा दावा कर्नाटकचे मंत्री आणि नेते नेहमीच करत होते.मात्र आज नवी दिल्ली येथे सीमा वादावरून झालेल्या महत्त्वाच्या बैठकीनंतर, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना सीमावाद अस्तित्वात असल्याचे मान्य करावेच लागले आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना, बेळगाव सीमा प्रश्नी बोलताना सीमावाद सर्वोच्च न्यायालयात असल्याने न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी काहीही बोलू नये, असा दमच भरला आहे. त्याचबरोबर सीमा भागात वादाचे प्रसंग उद्भभवू नयेत, यासाठी दोन्ही राज्यातील एकूण सहा मंत्री एकत्र येऊन काम करतील अशीही महत्त्वाची सूचना केली आहे.
केंद्रीय गृहमंत्र्यांच्या सूचनेला केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनीही सहमती दर्शविली आहे. त्यामुळे आजच्या बैठकीनंतर केंद्रीय गृहमंत्र्यांनी सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयामुळे कर्नाटक सरकारला सीमावाद अस्तित्वात असल्याचे मान्य करावे लागले आहे. बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांना आजची बैठक निश्चितच दिलासा देणारी आहे.