शालेय विद्यार्थिनींना बस थांबा सोडून उतरवले बारसमोर
सुळगा (हिं.) येथील प्रकार
संतप्त ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा
बस रोखून चालक-वाहकाला विचारला जाब
सुळगा (हिं.) / वार्ताहर
सुळगा (हिं.) (ता. बेळगाव) येथील शालेय विद्यार्थिनी बेळगाव ते कुद्रेमनी या बसमधून प्रवास करत असताना, बस चालक आणि वाहकाने मनमानीपणे सुळगा (हिं.) येथील थांब्यावर बस न थांबवता त्यांना कल्लेहोळ क्रॉसनजीक एका बार समोर उतरवले. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी बस रोखून चालक वाहक विरुद्ध आपला संताप व्यक्त केल्याची घटना बुधवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यानंतर
सुळगा (हिं.) येथील १६ विद्यार्थिनी बेळगाव ते कुद्रेमनी बसमधून प्रवास करत होत्या. मात्र त्यांना सुळगा (हिं.) येथे न उतरविता कल्लेहोळ क्रॉस येथे असलेल्या एका बार समोर उतरवण्यात आले. यावेळी चालक आणि वाहकाने विद्यार्थिनींना शिवीगाळ केली तसेच या बसमधून प्रवास करू नये अशी सक्त ताकीद दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या विद्यार्थिनींनी गावकऱ्यांना या प्रकाराची माहिती दिली. माहिती मिळताच संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ही बस अडवून चालक आणि वाहक या दोघांनाही चांगलेच धारेवर धरले.
कुद्रेमनी बस येतात हे विद्यार्थी बस मध्ये चढले तर, आम्ही आंब्यावर बस थांबवत नाही असे सांगून विद्यार्थिनींना अपशब्द बोलून शिवीगाळ करून त्रास दिला जातो. आमच्या गावासाठी सुरळीत बस व्यवस्था नाही. तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषी चालक व वाहकांवर योग्य ती कारवाई करावी व आमच्या भागासाठी बसची व्यवस्था करावी अशी मागणी सुळगा (हिं.) येथील ग्रामस्थांनी केली आहे.