राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालय कावळेवाडी (ता. जि. बेळगाव) यांच्यातर्फे आयोजित कावळेवाडी- बेळगुंदी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आणि मार्गदर्शनपर व्याख्यानाचा कार्यक्रम काल रविवारी सकाळी श्री विठ्ठल रुक्माई मंदिर येथे उत्साहात पार पडला.
सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंडलगा ग्रा. पं. सदस्या रेणू पांडुरंग गावडे या होत्या. त्याचप्रमाणे प्रमुख वक्ते म्हणून टिळकवाडी बेळगाव येथील नेक्सस इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्या प्रीती अर्जुन पाटील, कवी प्रा. निलेश एन. शिंदे, तेजस्विनी कांबळे आणि आर.के. ओऊळकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळळी, सागर भोसले, पवन कांबळे व संस्थेचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य वाय. पी. नाईक व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी संत ज्ञानेश्वर फोटो पूजन बेळगांव जिल्हा पंचायतीच्या शिक्षण आणि आरोग्य स्थायी समितीचे माजी अध्यक्ष मोहन मोरे यांच्या मातोश्री गंगुबाई मोरे यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा गांधी फोटो पूजन वनिता कणबरकर, सावित्रीबाई फुले फोटो पूजन प्रतीक्षा येळ्ळूरकर, तर छ. शिवाजी महाराज फोटो पूजन प्राचार्य प्रीती अर्जुन पाटील यांच्या हस्ते झाले.
नेक्सस इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या प्राचार्या प्रीती अर्जुन पाटील यांनी यावेळी आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन अतिशय सुंदर असला पाहिजे. धावपळीच्या या युगात प्रत्येक जण सुखासाठी धडपडतो पण नेमके सुख कशामध्ये आहे हे मात्र उशिरा कळतं सध्याच्या स्पर्धात्मक युगात वावरत असताना प्रत्येक क्षेत्रामध्ये स्पर्धा वाढलेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मनात असणारा न्यूनगंड बाजूला सारून नियोजनबद्ध आराखडा तयार करून अभ्यास करायला हवा. नियोजन करून अभ्यास केला तर स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवणं कठीण नाही. हे नव्या पिढीने समजून घ्यायला हवे असे सांगून अवांतर वाचन माणसाच्या जीवनामध्ये कलाटणी देते आणि यशस्वी वाटचाल करण्यासाठी प्रेरणा देत राहते. जीवनातील तीन मूलमंत्र अत्यंत नीटनेटके नियोजन , तंदुरुस्त आरोग्य आणि वेळेचे काटेकोर पालन केल्यास यश मिळाला अधिक वेळ लागणार नाही असे प्रतिपादन प्राचार्या प्रीती पाटील यांनी केले.
प्रमूख वक्ते कवी प्रा. निलेश एन. शिंदे, तेजस्विनी कांबळे, आर.के. ओऊळकर यांचीही समयोचित भाषणे झाली. यावेळी कावळेवाडी – बेळगुंदी पंचक्रोशीतील एसएससीच्या परीक्षेत 80 टक्के पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा विषेश सत्कार करुणा भास्कळ (बिजगर्णी), प्रेरणा मुंजोळे (बेळवटी), सुदेश पाटील, रोहिणी पाटील (कर्ले), निखिल कणबरकर (विज्ञान विकास हायस्कूल महाद्वार रोड बेळगांव), रूपाली मोटर (राकसकोप), मंथन पाटील (बेळगुंदी), गौरी शहापूरकर (बेळगुंदी), प्रणाली मोरे (कावळेवाडी), हर्षद भैरटकर (विद्या विकास हायस्कूल महाद्वार रोड) बेळगांव यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच स्वस्तिक मोरे (पैलवान), निशिगंधा मोरे (एम.कॉम.), भारत मोरे (आर्मी), यशवंत जाधव (सामाजिक कार्यकर्ते), कुमार बाचीकर (भारतीय नौदल ), स्वाती कांबळे आणि अविनाश कांबळे यांचाही सत्कार झाला. प्रारंभी स्वागत संगीता कनबरकर यांनी, तर प्रास्ताविक संस्थेचे अध्यक्ष निवृत्त प्राचार्य वाय. पी. नाईक यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय आरती मोरे आणि कांचन सावंत यांनी करून दिला. यावेळी केदारी कणबरकर, मोनाप्पा गावडे मोरे, पांडुरंग सातेरी मोरे, अविनाश कांबळे, यशवंत मोरे , कल्लाप्पा येळ्ळूरकर, मुकुंद ओऊळकर, गोपाळ जाधव, मंगांना कार्वेकर तसेच गावातील विविध मंडळांचे पदाधिकारी सदस्य ग्रामस्थ, प्राध्यापक, शिक्षक, विद्यार्थी, पालक हितचिंतक आणि शिक्षणप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन सुरज मोरे व दौलत कणबरकर यांनी केले. आभार ॲड. मनोहर मोरे यांनी मानले.