पोलीस प्रशासन, एफएफसीतर्फे कार्यशाळा संपन्न
कर्नाटक पोलीस प्रशासनातर्फे फेसबुक फ्रेंड्स सर्कलच्या सहकार्याने मोबाईल वापर, सायबर गुन्हेगारी, आरोग्याची काळजी आदी विषयावर शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शनपर कार्यशाळा आज सोमवारी दुपारी उस्फुर्त प्रतिसादात पार पडली.
शहरातील श्रीनगर गार्डन नजीकच्या लव्ह डेल सेंट्रल स्कूलच्या सभागृहात आयोजित सदर कार्यशाळेस प्रमुख वक्ते म्हणून कायदा आणि सुव्यवस्था विभागाचे शहर पोलीस उपायुक्त शेखर एच. टी. उपस्थित होते. सदर कार्यशाळेत दीर्घकाळ मोबाईल फोन वापरण्याचे तोटे आणि सोशल मीडियाचा वापर करताना काय करावे आणि काय करू नये. सायबर गुन्हेगारी. आपल्या आरोग्याची व्यवस्थित काळजी कशी घ्यावी. प्रतिजैविकांचा (अँटी ड्रग) वापर आणि त्यांचे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम. नागरी सेवा परीक्षांसाठी कशी तयारी करावी. उत्तम वागणूक कौशल्य आदींविषयी व्हिडिओ आणि पीपीटी स्लाईड शोच्या माध्यमातून मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी प्रमुख वक्त्यांनी उपस्थित विद्यार्थी विद्यार्थिनींची संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले. त्याचप्रमाणे इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांची मदत कशाप्रकारे मिळवता येते याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. कार्यशाळेस लव्ह डेल सेंट्रल स्कूलच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रेरणा घाटगे, मुख्याध्यापिका लक्ष्मी इंचल यांच्यासह सर्व शिक्षक वर्ग त्याचप्रमाणे कार्यशाळेचे समन्वयक फेसबुक फ्रेंड्स सर्कलचे (एफएफसी) प्रमुख संतोष आर. दरेकर, अवधूत तुडवेकर, प्रसाद हुली आदी उपस्थित होते.