येत्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर झेंडा चौक मार्केट सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळातर्फे येत्या शुक्रवार दि. 22 सप्टेंबर 2023 रोजी उद्योगपती शिरीष गोगटे पुरस्कृत 7 व्या रावसाहेब गोगटे स्मृती चषक भव्य टॉप -10 करेला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ झेंडा चौक यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. बैठकीस मंडळाचे पदाधिकारी अजित सिद्दण्णावर, राजू हंगिरगेकर, शिरीष गोगटे हेमंत हावळ, एम. गंगाधर, सुनील राऊत, मोतीचंद दोरकाडी, अमित किल्लेकर, राजू गाडवी, गिरीश पाटणकर, मिलिंद पाटणकर, सचिन हंगिरगेकर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी करेला स्पर्धेचे पुरस्कर्ते प्रसिद्ध उद्योगपती शिरीष गोगटे यांना छ. शिवाजी महाराज यांची प्रतिमा देऊन खास गौरविण्यात आले.
ही रावसाहेब गोगटे स्मृती चषक भव्य चषक टॉप -10 करेला स्पर्धा बेळगाव जिल्हा शरीर सौष्ठव संघटनेच्या मान्यतेने होत आहे. सदर स्पर्धेतील पहिल्या दहा क्रमांकाच्या विजेत्यांना अनुक्रमे 5000 रु., 4000 रु., 3000 रु., 2500 रु., 2000 रु. आणि उर्वरित पाच विजेत्यांना प्रत्येकी 1000 रुपये, प्रशस्तीपत्र व स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. पारंपारिक क्रीडा प्रकार जपून त्यांचे संवर्धन करण्यासाठी झेंडा चौक सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळाकडून गेल्या 6 वर्षांपासून ही करेला स्पर्धा आयोजित केली जात आहे.