येत्या श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे शहापूर भागातील सर्व सार्वजनिक श्री गणेश उत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मंगळवारी घेण्यात आली.
शहापूर पोलीस ठाण्याच्या आवारात या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीमध्ये पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी यंदाचा श्री गणेश उत्सव शांततेने सुरळीत पार पाडण्याबाबत मार्गदर्शन केले. कोणत्याही परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था भंग होणार नाही याची दक्षता प्रत्येक मंडळांने घेतली पाहिजे.
श्री गणेशोत्सव काळात डॉल्बीचा वापर टाळावा. मंडपाच्या ठिकाणी रस्त्यावरील रहदारी अडथळा निर्माण होणार नाही याची काळजी घेतली जावी वगैरे सूचना यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या. तसेच एक खिडकी सुविधेबाबत माहिती दिली. यावेळी उपस्थित मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी आवश्यक सुविधांसंदर्भात सूचना मांडण्यासह कांही तक्रारीही केल्या. तेंव्हा योग्य सूचनांचे स्वागत करून संबंधित तक्रारींचे निवारण करण्याचे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले.