पुणे येथील चपराक प्रकाशन प्रकाशित आणि ज्येष्ठ पत्रकार सुभाष धुमे लिखित शहीद या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी बेळगावात झाले ज्येष्ठ पत्रकार व तरुण भारतचे संपादक जयवंत मंत्री यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले यावेळी पत्रकार विकास अकादमीचे अध्यक्ष प्रसाद सू प्रभू उपाध्यक्ष वैजनाथ पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
गडहिंग्लज येथील एक हरहुन्नरी तरुण संजय चौगुले यांनी काबाडकष्ट करून जिद्दीने प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. प्रतिकूल परिस्थितीत परिश्रम घेत ते पोलिस दलात दाखल झाले .अशातच त्यांना एका गुंडाच्या टोळीशी संघर्ष करताना वीर मरण आले. आपल्या ध्येयासाठी समाजकंटकांशी चार हात करताना असा देह पडणे म्हणजे पूर्वपुण्याईच. संजय चौगुले यांनी समाजासाठी जे बलिदान दिले त्याची तुलना इतर कशाशीच होऊ शकत नाही. यामुळे संजय चौगुले यांच्या जीवनाची कथा या पुस्तकात मांडलेली आहे. अशी माहिती लेखक सुभाष धुमे यांनी यावेळी दिली.
समाजातील प्रत्येक स्तरातील व्यक्तीने हे पुस्तक वाचण्यासारखे आहे. नव्या जिद्दीने पुढे येणाऱ्या तरुणांनी तर हे पुस्तक नक्कीच वाचावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.