नेहरूनगर येथील जेएनएमसी कॉलेज समोर जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती लागून हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहून वाया जात आहे. याकडे लोकप्रतिनिधी व पाणी पुरवठा खात्याने तात्काळ लक्ष देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी केली आहे.
नेहरूनगर येथील जेएनएमसी कॉलेज समोर गेल्या काही दिवसांपासून मुख्य जलवाहिनी फुटून मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. सततच्या वर्दळीच्या सदर रस्त्यावर दररोज हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे. यंदा कमी पावसामुळे राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे त्याचप्रमाणे येत्या उन्हाळ्यातील पाणी टंचाईचे संकट टाळण्यासाठी पाण्याची बचत अत्यावश्यक आहे. तरी एल अँड टी कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ जेएनएमसी समोरील जलवाहिनीच्या दुरुस्तीचे आदेश द्यावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते प्रसाद चौगुले यांनी केली आहे.