स्विमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस क्लब बेळगावच्या होतकरू जलतरणपटूंनी नवी दिल्ली येथे नुकत्याच पार पडलेल्या 67 व्या राष्ट्रीय पातळीवरील क्रीडा स्पर्धा आणि शालेय मुलांसाठीचा क्रीडा महोत्सव -2024 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
भारतीय शालेय क्रीडा महासंघाने नवी दिल्ली येथे गेल्या 3 ते 9 जानेवारी 2024 या कालावधीत 67 व्या राष्ट्रीय पातळीवरील खेळ आणि शालेय मुलांसाठीचा क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले होते. या क्रीडा महोत्सवातील जलतरण विभागात बेळगावच्या सेंटपॉल्स हायस्कूलचा विद्यार्थी अमन अभिजीत सूणगार याने 4×100 मी. मिडले रिले शर्यतीत रौप्य पदक, त्याचप्रमाणे 50 मी. बॅकस्ट्रोक आणि 100 मी. शर्यतीत कांस्यपदक पटकाविले. ज्ञान प्रबोधन हायस्कूलची विद्यार्थिनी सुनिधी सुहास हलकरे हिने 100 मी. बॅकस्ट्रोक शर्यतीत, तसेच समृद्धी सुहास हलकरे हिने 200 मी बॅकस्ट्रोक शर्यतीत कांस्य पदक मिळविले. हे तीनही यशस्वी जलतरणपटू केएलई सुवर्ण जेएनएमसी जलतरण तलावामध्ये पोहण्याचा सराव करतात. त्यांना जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितीश कडूचकर, गोवर्धन काकतकर, आणि इमरान उचगावकर यांचे मार्गदर्शन, त्याचप्रमाणे आई-वडिलांसह केएलई सोसायटीचे चेअरमन डॉ. प्रभाकर कोरे, जय भारत फाउंडेशनचे अध्यक्ष जयंत हुंबरवाडी, रो. अविनाश पोतदार, माणिक कापडिया, लता कित्तूर, सुधीर कुसाणे, प्रसाद तेंडुलकर आदींचे प्रोत्साहन लाभत आहे. राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेतील यशाबद्दल उपरोक्त जलतरणपटूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.