डॉ. अमित गाडेकर यांनी निलजी सारख्या एका छोट्याशा खेड्यामध्ये राहून पी. एच.डी.करण्याचे आपले ध्येय साध्य केले आहे. त्यानी सुप्रसिद्ध “आल्टो यूनिवर्सिटी” हेलसिंकि फिनलँड येथून थीएरोटीकल कम्प्युटर सायन्स (गणित) (Theoretical computer science (mathematics) या विषया मध्ये आपली पी. एच. डी. पूर्ण केली आहे. त्यानी लिहिलेले अनेक प्रबंध आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झालेले आहेत.त्यांच्या काही प्रबंधांना पुरस्कारसुद्धा मिळाले आहेत. त्या पैकी एक म्हणजे “बेस्ट स्टुडन्ट पेपर” हा पुरस्कार आहे.त्यांचे प्राथमिक शिक्षण केंद्रीय विद्यालय, सांबरा येथे झाले असून, हे शिक्षण घेत असतांना त्यांनी देश भक्तीवर हिंदी मध्ये अनेक कविता लिहिलेल्या आहेत. या नंतर त्यानी जी. एस. एस. कॉलेज मधून आपले बारावीचे शिक्षण 98% गुण घेवून पूर्ण केले. कर्नाटक आणि महाराष्ट् सरकारतर्फे घेण्यात आलेल्या सी. ई. टी. परीक्षेत चांगली गुणवत्ता मिळविल्यामुळे डॉ. अमित गाडेकर यांना कर्नाटकात तसेच महाराष्ट्रात मेडिकलला एम.बी. बी. एस. साठी सरकारी कोट्यातून प्रवेश मिळत असताना सुध्दा वैद्यकीय क्षेत्राकडे न वळता त्यांनी आपल्या आवडत्या अभियांत्रिकी शाखेतून शिक्षण निवडून, जी.आय.टी. कॉलेज मधून “इलेक्ट्रॉनिक अँड कम्युनिकेशन” या शाखेमधुन आपली बी.ई. पदवी मिळविली. डॉ. अमित गाडेकर यांचा गणित हा विषय अतिशय आवडीचा असल्याने त्यांनी गणित या विषया मध्ये 100 पैकी 100 गुण घेतले. शिक्षण घेत असताना सुध्दा त्यांनी आपले बाकीचे छंद कविता लेखन, कथा लेखन आणि व्हॉलीबॉल, क्रिकेट, टेबल टेनिस सारखे खेळ जोपासत हे यश संपादित केले आहे. जी. आय. टी. कॉलेज कँपस मधून इन्फोसिस या कंपनी मध्ये त्यांची निवड करणेत आली. नोकरी मध्ये रूजू झाले. ही नोकरी करीत असतांना डेल या नामांकित कंपनी मार्फत सिंगापूर येथे नोकरीसाठी ऑफर आली म्हणून ते सिंगापूर येथे रुजू झाले. त्यांनी नोकरी करीत, उच्च शिक्षण घेण्यासाठी जी महत्वाची देश पातळीवर घेण्यात आलेल्या गेट परीक्षेत एकूण 2.20 लाख विद्यार्थ्यां मधून 273 वा रँक घेवून घवघवीत यश संपादित केले आणि म्हणूनच त्यांना “इंडियन इन्स्टीट्यूट आफ सायन्स, बेंगलोर” (IISc) या भारताच्या सर्वोतम कॉलेज मध्ये “एम. एस.” करणे करिता शिष्यवृत्ती वर प्रवेश मिळविला. तेथून त्यांनी कम्प्युटर सायन्स मधे “एम. एस.” ही पदव्युत्तर पदवी मिळविली. कॉलेज कँपस मधून त्यांची “सिट्रिक्स” या अमेरिकन कंपनीच्या बेंगलोर येथील ऑफिस येथे रिसर्च अँड डेव्हलपमेन्ट मध्ये चांगली नोकरी मिळाली. ही नोकरी करीत असतांना डॉ अमित यांनी विदेशात पी. एच.डी. करण्याचे स्वप्न मनाशी बाळगून त्या दृष्टीने अभ्यास सुरू केला आणि हेलसिंकी, फिनलँड येथे नामांकीत “आल्टो युनिवर्सिटी” मध्ये फिनलँड सरकारच्या भरघोस अशा शिष्यवृत्तीवर पी. एच. डी. करीता प्रवेश मिळविला आणि अशा त-हेने सहा वर्षाच्या प्रदिर्घ आणि सततच्या अभ्यासामुळे त्यांनी डॉक्टरेट पदवी प्राप्त केली
डॉ. .अमित गाडेकर, यांची इस्त्राईल येथील “बार-इलान यूनिवर्सिटी” मध्ये रिसर्चर म्हणून नियुक्ती झाली असून 15 ऑक्टोबर 2023 पासुन रूजू होणार होते, परंतु 07 ऑक्टोबर पासून इस्त्रायल या देशात युध्द सुरू झाल्याने, सध्या नोव्हेंबर 2023, पासून त्यांचे काम घरातुन सुरू आहे. या त्यांच्या दैदिप्यमान यशामुळे, डाॕ.अमित गाडेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
अमित गाडेकर हे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे निवृत्त शाखाधिकारी श्री भुजंग गाडेकर आणि सौ.रंजना गाडेकर यांचे ज्येष्ठ सुपुत्र आहेत.