No menu items!
Monday, December 23, 2024

काळ आला होता पण…

Must read

चिखले येथील शंभर फूट खोल दरीत पडूनही तरुण बचावला

दुचाकीवरून मित्रांसोबत कर्नाटक आणि गोव्याच्या हद्दीवर असलेले चिखले धबधबा स्थळ पाहण्यासाठी गेलेला तरुण दुचाकीसह थेट शंभर फूट खोल दरीत पडला. दैव बलवत्तर म्हणून किरकोळ खरचटण्यापलीकडे त्याला काहीही झाले नाही. खानापूर आणि गोवा पोलिसांनी राबविलेल्या संयुक्त मोहिमेत पाच तासानंतर तरुणाला सही सलामत बाहेर काढण्यात यश आले. विनायक सुनील बुतूलकर (20) रा. कॅम्प बेळगाव असे सुदैवी तरुणाचे नाव आहे.
कॅम्प बेळगाव येथील विनायक, दर्शन, विनय हे मित्र दुचाकीवरून चिखले-पारवाड रस्त्यावर असलेल्या धबधब्याच्या ठिकाणी फिरण्यासाठी गेले होते. दुचाकी चालवत ते कठड्यावरून पर्वतराई न्याहाळत होते. विनायक दुचाकी चालवत होता. समोर अचानक वळण आल्याने दुचाकीवर नियंत्रण राहिले नाही. दुचाकी खाली कोसळणार हे लक्षात येताच मागे बसलेल्या दोघांनीही उडी मारली. पण विनायक दुचाकीसह खाली कोसळला. सुदैवाने त्याने खालच्या झाडीत पडेपर्यंत दुचाकीचे हँडल सोडलेच नाही. दुचाकीच्या आधाराने तो खाली कोसळल्याने जबर मार लागण्यापासून सुरक्षित राहिला. तो कोसळलेल्या ठिकाणी गोव्यातील टॉवरचे मोबाईल नेटवर्क उपलब्ध होते. त्याने तात्काळ वर असलेल्या मित्रांशी संपर्क साधला. खाली असलेल्या एका झुडपात आपण सुरक्षित असल्याचे सांगितले. मित्रांनी खानापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलीस निरीक्षक रामचंद्र नायक यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थितीची माहिती घेतली. अग्निशमन दलालाही बोलवण्यात आले. चिखले गावातील गुराख्यांना दरीत उतरण्याचा अनुभव असल्याने त्यांचीही मदत घेण्याचे ठरवण्यात आले. या कामी हवालदार जगदीश काद्रोळी, वासुदेव पार्सेकर, विशाल तेलंग, विष्णू पाटील, सखाराम गावडे, संजय पाटील, राजू मडिवाळर यांच्या मदतीने सायंकाळी साडेसहाच्या सुमारास विनायकला सुरक्षितपणे वर आणण्यात आले.

कर्नाटकातून गोव्यात उडी, तरीही घाबरला नाही गडी !

चिखले टेकडीवर कर्नाटकची सीमा संपते. त्यापुढे गोवा राज्याची सीमा सुरू होते. नजारा पाहण्याचा पॉइंट कर्नाटकच्या हद्दीत आहे. तर धबधब्याखालील दरी गोव्याच्या हद्दीत आहे. विनायक कोसळलेली जागा गोव्याच्या हद्दीत येते त्यामुळे खानापूर पोलिसांनी गोवा पोलिसांनाही घटनेची माहिती दिली. त्यांनीही घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यात सहभाग घेतला. विनायकने दरीत कोसळतानाही दुचाकी आपल्यापासून दूर जाऊ न देता दाखवलेले प्रसंगावधान आणि समयसूचकता यामुळे त्याचे किरकोळ जखमेवर निभावले.

- Advertisement -spot_img

More articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest article

error: Content is protected !!