कोवाड-बेळगाव रस्त्यावर दुचाकी घसरून होसूर ता. चंदगड येथील तरुणी ममता विठ्ठल व्हडगे (वय २३) हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. हि घटना रविवारी सायंकाळी घडली.याबाबत चंदगड पोलीस ठाण्यात व्हडगे यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ममता व तिचा भाऊ कोणेरी व्हडगे कोवाड येथे जत्रेच्या खरेदीला आले होते. खरेदी करून दुचाकीवरून जात असताना कागणी-कोवाड रस्त्यावर गाडीचा ताबा सुटून गाडी घसरून पडली यात ममता हिच्या डोकीला जबर दुखापत झाली. तिला बेळगाव येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. ही दुःखद घटना समजताच होसुर गावसह परिसरात शोककळा पसरली.सोमवारी सकाळी ममता हिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तर दुचाकीचा चालक व ममता हिचा लहान भाऊ कोणेरी हा जखमी झाला. होसूर येथे पाच वर्षानंतर लक्ष्मी यात्रा मंगळवार दि. १५ पासून सुरू होत आहे. या यात्रेच्या एक दिवस अगोदर हि दुःखद घटना घडल्याने जत्रेच्या आनंदावर विर्जन आले आहे. ममता हि कोवाड येथील कला महाविद्यालयात बी. ए. पर्यंत शिक्षण घेऊन दोन महिन्यापूर्वी पुणे येथे एका खासगी कंपनीमध्ये कामाला लागली होती.तर तिचा साखरपुडा हि झाला होता. पण लग्नाच्या बोहल्यावर चढण्या अगोदरच ममताचा अकाली मृत्यू झाला असल्याने परिसरात या दुःखद घटनेने हळहळ व्यक्त होत आहे. याबाबत चंदगड पोलिसात या घटनेची नोंद झाली असून कोवाड पोलीस चौकीचे पोलीस नाईक राज किल्लेदार अधिक तपास करत आहेत.