महाराष्ट्रातील पाच चित्रकारांनी एकत्रितपणे सादर केलेल्या त्यांच्या वैशिट्यपूर्ण चित्रकृतीचा अनोखा कलाविष्कार “चित्रेय” या शीर्षकांतर्गत दिल्ली येथील ललित कला अकादमी येथे संपन्न झाले.
येथील ललित कला अकादमीच्या कलादीर्घामध्ये एक समूह चित्रप्रदर्शन संपन्न झाले. पाच चित्रकारांचा त्यात सहभाग होता. प्रत्येक चित्रकाराची शैली भिन्न व असीम होती, त्यामुळेच या चित्रप्रदर्शनाला ‘चित्रेय’ असे शीर्षक देण्यात आले होते.
केशव कासार यांची चित्रे कुंडलिनी जागृतीसाठी केलेल्या ध्यान साधनेमधील अनुभव दर्शवतात. मेरुदांडातील षट्चक्रांचे आकार त्यांच्याशी निगडीत दैवते आणि वाहने असे आकार दर्शविणारी ही चित्रे समआंगिक आहेत. मध्यात एका अदृश्य रेषेने चित्राचे डावा उजवा असे दोन समभाग होतात. ध्यानावस्थेचा समतोल यातून पाहिल्यावर जाणवला.
वर्षा कुलकर्णी यांच्या अमूर्त चित्रात निसर्गातील घटितांचे प्रतिबिंब जाणवते. निसर्गातील काही दृश्य क्षण वर्षा यांनी अमूर्त पद्धतीने,केवळ रंगांच्या स्ट्रोक्समधून व्यक्त केले होते.
श्रद्धा कामत-केकरे यांनी एका स्त्रीच्या जीवनात घडणारे बदल, त्याचा तिच्या मनावर होणारा परिणाम आणि निसर्गतील घटकांवर त्याचे होणारे आरोपण व्यवस्थितरित्या चित्रित केल्याचे जाणवले. एखादी स्त्री आकृती आणि आजुबाजूला तिचे भावविश्व दाखवणारे सूक्ष्म घटक यांच्या संगमातून श्रद्धा काव्यात्मक पद्धतीने आशय व्यक्त होतानाचे जाणवले.
नीलिमा कढे यांची चित्रे अमूर्ताचा प्रवास दर्शवतात. शास्त्रीय संगीतामध्ये जसे स्वरावलीतून उमलणारे आकृतीबंध आस्वाद्य असतात तसे रंगछटांचे संमेलन त्यांच्या चित्रात उतरावे, त्यांचे एकमेकांबरोबर साहचर्य हाच चित्रविषयाचे प्रदर्शन केले होते. रंग रेषा आकार या मूल घटकांची एकमेकांशी असलेली संगती उस्फूर्त रितीने मांडल्यामुळे दर्शकांना नक्कीच भावली असेल.
श्रुती गांवकर ही व्यवसायाने आर्किटेक्ट असून तिला दृश्य कलेतील आधुनिक अभिव्यक्ती आपलीशी वाटते. इनस्टोलेशनच्या माध्यमातून स्पर्श भावनेशी निगडीत रंगानुभवानीसर्वांचे लक्ष वेधले. पाचही कलाकारांचे आपापले दृश्यानुभव त्यांच्या कलाकृतीतून व्यक्त होत होते.
नीलिमा या ठाणे स्कूल ऑफ़ आर्ट च्या फाऊंडर प्राचार्य असून वर्षा आणि केशव तेथील प्राध्यापक आहेत. आपल्याकडे आईच्या नावावरुन मुलांना ओळखण्याची प्रथा आहे. जसे कुंतीचा कौंतेय. तसे चित्रकला ही या कलावंताना आपली जननी वाटते, कदाचित म्हणून त्यांनी चित्रेय हे नाव घेतले असावे. ही चित्रे प्रदर्शनी 16 फेब्रुवारी रोजी सुरू झाले व 23 फेब्रुवारी रोजी संपणार आहे.