बेळगाव: देशातील वेगाने विकसित होणाऱ्या शहरांपैकी एक असलेल्या, दुसरी राजधानी म्हणून ओळख असलेल्या बेळगावमधून अधिकाधिक नवीन रेल्वे गाड्या चालवण्यासाठी केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवावा, अशी मागणी दक्षिण पश्चिम रेल्वे वापरकर्ता सल्लागार समिती सदस्य प्रसाद कुलकर्णी यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, हॉटेल्समध्ये काम करणारे कामगार, विद्यार्थी आणि उद्योजक यांना सोयीस्कर होईल, अशा दृष्टीने मिरज-मंगलुरू ही रेल्वे दररोज सुरू करावी. भाविकांना सोयीसाठी हुबळी-मिरज-अयोध्या, तसेच बेळगाव-गोरखपूर-गुवाहाटी ही रेल्वे गाड्या सुरू कराव्यात. यामुळे कामगार, सैन्य दलातील जवान, वायुदलातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना अधिक सोयी मिळतील.
माजी रेल्वेमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या कार्यकाळात सुरू करण्यात आलेल्या धारवाड-बेळगाव रेल्वेमार्गाचे काम त्वरीत पूर्ण करण्यासाठी बेळगाव व धारवाड जिल्हाधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. तसेच, बेंगळुरू ते बेळगाव विशेष रेल्वे गाडीचे सकाळी 9 वाजता साफसफाई केल्यानंतर ती मिरज-बेळगाव मार्गावर दररोज चालवावी, ज्यामुळे या भागातील प्रवाशांना अधिक सोयी मिळतील व रेल्वेला चांगले उत्पन्न होईल, असा सल्लाही त्यांनी दिला.
हुबळी-बेळगाव-पुणे मार्गावर धावणाऱ्या ‘एक भारत’ या रेल्वे गाडीला मुंबईच्या दादरपर्यंत विस्तारित करावे. त्याचबरोबर, बेळगावहून मुंबईकडे जाण्यासाठी रात्री 9 नंतर कोणतीही रेल्वे गाडी नाही. त्यामुळे, बेळगाव-मुंबईदरम्यान विशेष रेल्वे सेवा सुरू करावी. यशवंतपुर-निजामुद्दीन संपर्कक्रांती एक्स्प्रेसला महाराष्ट्रातील कोपरगाव रेल्वे स्थानकात थांबवावे, जेणेकरून शिर्डी साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांसह महाराष्ट्रातील विविध भागांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सोय होईल.
हुबळी-बेळगाव-रामेश्वर या मार्गावर आठवड्यातून किमान एकदा विशेष रेल्वे चालवावी, ज्यामुळे रामेश्वरला जाणाऱ्या भाविकांना मदत होईल. बेळगाव-विजयवाडा ही रेल्वे आठवड्यातून दोनदा, बेळगाव-मंगळुरू रेल्वे, हुबळी-अहमदाबाद (आठवड्यातून एकदा), बेळगाव-हुबळी-ऋषिकेश मार्गावर रेल्वे सेवा सुरू करावी, ज्यामुळे या भागातील प्रवाशांना मोठ्या प्रमाणात फायदा होईल.
कर्नाटक-महाराष्ट्र-गोवा या तीन राज्यांच्या दळणवळणाचे मुख्य केंद्र असलेल्या बेळगावमध्ये प्रवाशांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात या भागाला अधिक संधी मिळाव्यात, अशी विनंती प्रसाद कुलकर्णी यांनी केली आहे.
देसूरमध्ये कोचिंग डेपो:
हुबळीत अनेक रेल्वे गाड्यांची वाहतूक असल्याने, बेळगावच्या बाहेर असलेल्या देसूर रेल्वे स्थानकात 3 पिटलाइन (रेल्वे डब्यांच्या स्वच्छतेसाठी), 2 स्टॅबिंग लाइन सुरू कराव्यात. तसेच, देसूर रेल्वे स्थानकात 2 अतिरिक्त प्लॅटफॉर्म बांधावेत, ज्यामुळे हुबळी रेल्वे स्थानकावरील ताण कमी होईल, असेही कुलकर्णी यांनी दक्षिण पश्चिम रेल्वे विभागीय व्यवस्थापक आणि रेल्वेमंत्री वी. सोमण्णा यांच्याकडे मागणी केली आहे.



