राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप सोहळा उत्साहात संपन्न
कार्वे पाटणे फाटा येथील व्ही. के. चव्हाण पाटील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराचा समारोप सोहळा दिमाखात संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अर्जुन पाटील होते. यावेळी उपाध्यक्ष मोनाप्पा पाटील, प्रल्हाद जोशी, उपसरपंच पुंडलिक गवसेकर, उद्योजक दयानंद रेडेकर, रवींद्र रेडेकर आणि शंकर मेणसे उपस्थित होते.
कार्यक्रमात कराओके गायनाच्या माध्यमातून तानाजी पाटील, देवयानी पाटील आणि तेजराज पाटील यांनी उपस्थितांची मनं जिंकली.
विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी मार्गदर्शन
या सोहळ्याला प्रमुख वक्ते म्हणून मा. शिवसंत संजय मोरे सर उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना “शिवचरित्राचा अभ्यास करून व्यक्तिमत्त्व विकास करा” असा संदेश दिला. तसेच, “भारताला जागतिक महासत्ता बनवण्याची जबाबदारी युवकांवर आहे” असेही त्यांनी ठामपणे सांगितले. उच्च शिक्षण घेऊन स्वतःच्या नावापुढे छत्रपती शिवरायांसारखी उपाधी लावण्याची प्रेरणा त्यांनी विद्यार्थ्यांना दिली.
यावेळी रक्तदान, वृक्षारोपण, व्यसनमुक्ती आणि सामाजिक ऐक्याच्या संकल्पना यावर भर देत त्यांनी युवकांना “गुणवंत, बलवंत, कर्तृत्ववान आणि किर्तीवान बना” असा संदेश दिला.
प्रमुख उपस्थिती आणि सूत्रसंचालन
कार्यक्रमात जिल्हा समन्वयक प्रा. एस. एन. पाटील, प्रा. घोरपडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी वक्त्यांचा परिचय रवी पाटील यांनी करून दिला.
यावेळी उपसरपंच पुंडलिक गवसेकर, प्रल्हाद जोशी व कार्यक्रमाचे अध्यक्ष अर्जुन पाटील यांची भाषणे झाली .
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रियांका तोगले मॅडम यांनी अतिशय प्रभावीपणे पार पाडले, तर प्रास्ताविक किरण भोगण (विद्यार्थिनी) हिने केले. शेवटी प्रा. अजय दळवी सर यांनी आभार प्रदर्शन करत कार्यक्रमाची सांगता झाली.
शिबिरातून विद्यार्थ्यांना नवा आत्मविश्वास
राष्ट्रीय सेवा योजनेच्या विशेष श्रमसंस्कार शिबिरामुळे विद्यार्थ्यांना सामाजिक बांधिलकीची जाणीव झाली असून, त्यांना व्यक्तिमत्त्व विकासाची नवी दिशा मिळाली आहे. संपूर्ण कार्यक्रमात विद्यार्थ्यांचा सहभाग लक्षणीय होता आणि त्यांनी घेतलेल्या संकल्पांमुळे समाजहिताच्या दिशेने सकारात्मक पावले उचलली जातील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.