बारावीच्या मराठी विषयाच्या प्रश्नपत्रिकेत असंख्य चुका असल्याने विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात यावेत यासाठी महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने पदवीपूर्व जिल्हा शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
तसेच मधु बंगारप्पा
शिक्षणमंत्री कर्नाटक राज्य यांना सुद्धा सदर निवेदनाची प्रत पाठविण्यात आली.
मंगळवारी पी.यु.सी. द्वितीय वर्षाचा (बारावी) मराठी विषयाचा पेपर होता. त्या प्रश्नपत्रिकेमध्ये असंख्य चुका असून चुकीची वाक्यरचना असणारे प्रश्न, चुकीचे शब्दोच्चार, चुकीचे व्याकरण यामुळे ही प्रश्नपत्रिका सदोष असून त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे आणि त्यांच्या गुणतालिकेत सुद्धा फरक पडणार आहे. हा मराठी भाषिक विद्यार्थ्यावर अन्याय असून सदर प्रश्नपत्रिकेतील चुकांची शहानिशा आणि सखोल चौकशी करण्यात यावी आणि त्याची जबाबदारी स्वीकारत सदर मराठी विषय परीक्षा दिलेल्या सर्व मराठी विद्यार्थ्यांना ग्रेस गुण देण्यात यावे ही सर्व विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या माध्यमातून मागणी करीत आहोत. तरी यावर गांभीर्याने विचार करून विद्यार्थ्यांच्यावर झालेल्या अन्यायाची तातडीने दखल घेण्यात यावी अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष अंकुश केसरकर सरचिटणीस श्रीकांत कदम, सुरज कुडूचकर हे उपस्थित होते.
श्री एम. एम. कांबळे यांच्या अनुपस्थितीत शाखाधिकारी श्रीमती वस्तद यांनी निवेदन स्वीकारले.