अपघातात गंभीर जखमी झालेल्या
व्यक्तीला विमा कंपनीने तुम्हाला कॅन्सर झाला आहे असे सांगून विमा देण्यास नकार दिला होता. मात्र, ग्राहक न्यायालयाने अपघात घडल्यानंतर विमा हा दिलाच पाहिजे म्हणून एका विमा कंपनीला पाच लाख रुपये देण्याचे आदेश बजावले आहेत. याचबरोबर संबंधित कंपनीला दंडही ठोठावण्यात आला आहे. मंजू बस्साप्पा सुलतानपूर (वय १९, रा. गौडर गल्ली, नागनूर ता. मुडलगी) याने एसबीआय कंपनीचा विमा घेतला होता. ४ ऑक्टोबर २०२३ रोजी त्याचा अपघात होऊन पाय फॅक्चर झाला. त्याला उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र विमा कंपनीने विमा भरण्यापूर्वीच संबंधित व्यक्तीला कॅन्सर असल्याचे कारण देत विमा देण्यास नकार दिला होता. विमा नाकारल्यामुळे मंजूने अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायालयाकडे दावा दाखल केला. न्यायालयाने मंजूची बाजू उचलून धरत विमा कंपनीने मंजुला पाच लाख रुपये देण्याचे आदेश बजावले आहेत . याचबरोबर आठ हजार रुपये दंडही ठोठावला आहे. अॅड. एन. आर. लातूर यांनी फिर्यादीच्या बाजूने काम पाहिले