बेळगाव तालुक्यातील अनेक रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवावे व अनेक रस्त्याचे दुरुस्ती ताबडतोब हाती घ्यावी या मागणीसाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बुधवार दिनांक १३ रोजी सकाळी ठीक ११.०० वाजता किल्ला येथील सार्वजनिक बांधकाम खात्याच्या (पीडब्ल्यूडी) कार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात येणार आहे.
पावसाळ्यामुळे तालुक्यातील अनेक रस्त्यावर पाणी साचून खड्डे पडले आहेत. तसेच अनेक खड्ड्यामुळे रस्त्याची चाळण झाली आहे.येथून रहदारी करताना नागरिकांना आपला जीव मुठीत घेऊन धरावा लागत आहे. या खड्ड्यामुळे अनेक लहान सहान अपघात घडत आहेत. यामुळे नागरिकांची मोठी गैरसर होत आहे.
येत्या काही दिवसात गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे, या उत्सवात गणेश भक्तांची गैरसोय दूर व्हावी. तरी गणेशोत्सवापूर्वी या रस्त्याची दुरुस्ती तात्काळ हाती घ्यावी व सर्व रस्त्यांची डागडुजी पूर्ण करावी अशी मागणी करण्यात येत आहे.याची दखल सार्वजनिक बांधकाम खात्याने घेऊन या रस्त्याची दुरुस्ती ताबडतोब करावी अशी मागणी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने करण्यात येणार आहे. हे निवेदन देण्यासाठी बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे पदाधिकारी,नियंत्रण या घटक समितीचे सदस्य,युवा व महिला आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन बेळगाव तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष माजी आमदार मनोहर किनेकर व सरचिटणीस अँड एम जी पाटील यांनी केले आहे.