महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयातील खटल्याच्या कामकाजासंदर्भात सल्ला देण्यासाठी गठित करण्यात आलेल्या तज्ज्ञ समितीची बैठक बुधवारी (दि. १०) होणार आहे. मुंबईतील मंत्रालयात दुपारी ३ वाजता ही बैठक होईल.
सीमाप्रश्नाच्या दाव्यासाठी महाराष्ट्र सरकारने दीड महिन्यांपूर्वी तज्ज्ञ समितीची पुनर्रचना केली आहे. या समितीचे अध्यक्षपद खासदार धैर्यशील माने यांच्याकडे असून, माजी खासदार धनंजय महाडिक सहअध्यक्ष आहेत. याशिवाय ‘पुढारी’चे मुख्य संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव, दिनेश ओऊळकर, अॅडव्होकेट ऑन रेकॉर्ड शिवाजी जाधव, प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव यांच्यासह सीमाभागातून समिती नेते, तज्ज्ञ निमंत्रित आहेत.
तज्ज्ञ समितीची बैठक व्हावी, यासाठी मध्यवर्ती म. ए. समितीकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत होते. अखेर बुधवारी ही बैठक होणार असून, गेल्या अनेक दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात रखडलेली याचिका सुनावणीला लवकर यावी, यासाठी रणनीती आखण्यात येणार आहे.