दसरा सुटीनंतर बुधवार दि. ८ ऑक्टोबरपासून शाळा पुन्हा गजबजणार आहेत. १७ दिवसांच्या सुटीनंतर पुन्हा शाळा सुरू होणार असल्याने शाळांमध्ये स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. सरकारी शाळांमधील काही शिक्षक जातनिहाय सर्वेक्षणामध्ये व्यस्त असले तरी इतर शिक्षक मात्र शाळा सुरू करण्यासाठी धडपड करत आहेत.
राज्य सरकारच्या सूचनेनुसार २१ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत दसऱ्याची सुटी देण्यात आली होती. कर्नाटकात दसरोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असल्याने या काळात सुटी देण्यात आली होती. त्यापूर्वी सहामाही परीक्षा घेण्यात
आल्या होत्या. तसेच सुटीमध्ये विद्यार्थ्यांना गृहपाठही शिक्षकांनी दिला होता. सरकारीसह अनुदानित व खासगी शाळांनाही सुटी देण्यात आली होती.
बुधवार दि. ८ पासून दसरा सुटीनंतर पुन्हा शाळा भरविल्या जाणार आहेत. सहामाही परीक्षांचा निकाल शिक्षकांनी तयार केला असून तो दोन दिवसांत विद्यार्थ्यांना दिला जाणार आहे. सरकारी शाळांच्या शिक्षकांवर जातनिहाय सर्वेक्षणाची जबाबदारी देण्यात आली आहे. हे सर्वेक्षण मंगळवारपर्यंत पूर्ण होणे गरजेचे होते. परंतु, सर्व्हरडाऊन व इतर समस्यांमुळे याचा कालावधी वाढविण्याची शक्यता आहे. त्यामुळे जे शिक्षक सर्वेक्षणाच्या कामामध्ये नाहीत, त्यांना पुढील काही दिवस शाळा चालवावी लागणार आहे